मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर बदलाची शक्यता, वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी वाढली
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर बदलाची शक्यता, वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी वाढली
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर बदलाची शक्यता निर्माण. वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलीवर पक्षातील नेत्यांचा वाढता असंतोष.
सायली मेमाणे
पुणे १४ ऑगस्ट २०२५ : मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलीबद्दल पक्षातील अनेक नेते नाराजी व्यक्त करत असून, अध्यक्षपदावर बदल घडवून आणण्याची चर्चा सुरू आहे.
वर्षा गायकवाड यांच्याकडून मुंबईतील विशेषतः कमकुवत विभागांमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी पुरेशी मेहनत घेतली जात नाही, अशी तक्रार काही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. वारंवार त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काही भागांमध्ये पक्षाच्या स्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप आहेत.
मंगळवारी मुंबई काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही ही नाराजी पुन्हा एकदा समोर आली. बैठकीत अनेक नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या कामकाजाबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नेतृत्वात बदल करण्याची गरज असल्याचे मत मांडले.
मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासोबत आघाडीच्या चर्चेत असताना, स्थानिक संघटन सक्षम आणि सक्रीय असणे गरजेचे आहे. अध्यक्षपदावर बदल झाल्यास निवडणुकीपूर्वी पक्षात नवा उत्साह निर्माण होऊ शकतो, असे पक्षातील काही सूत्रांचे म्हणणे आहे.
पक्ष नेतृत्व या नाराजीची नोंद घेऊन काही दिवसांतच निर्णय घेण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड यांची जागा घेण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत काँग्रेसमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे मुंबई काँग्रेसच्या प्रतिमेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी पक्षाला अंतर्गत मतभेद दूर करून एकसंघपणे लढावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.