मुंबई कोस्टल रोड 2 साठी 27 कोटींचा पूल पाडणार? महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
मुंबई : कोस्टल रोड 2 साठी सात वर्षांपूर्वीचा 27 कोटींचा पूल पाडणार – सार्वजनिक पैशांची उधळपट्टी?
कोस्टल रोड 2 प्रकल्पासाठी BMC गोरेगावमधील ७ वर्षांपूर्वी बांधलेला 27 कोटींचा वीर सावरकर उड्डाणपूल पाडणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक पैशांची उधळपट्टी झाली का, यावर वाद सुरू झाला आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : मुंबई महापालिकेचा (BMC) महत्वाकांक्षी कोस्टल रोड 2 प्रकल्प, वर्सोवा ते दहिसर दरम्यान पश्चिम उपनगरांना उत्तरे-दक्षिणेने जोडणारा, आता नव्या वादात अडकला आहे. या प्रकल्पासाठी गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला गेला असून, विशेष बाब म्हणजे हा पूल अवघ्या ७ वर्षांपूर्वी तब्बल २७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. आता तोच पूल कोस्टल रोडच्या मार्गातील अडथळा ठरत असल्यामुळे पाडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रस्तावित रस्त्याचा मार्ग या उड्डाणपुलाखालून जाणार असून, अभियांत्रिकी व सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाची उपस्थिती संभाव्य अडथळा ठरू शकते. त्यामुळे त्याचा पाडाव अनिवार्य मानला जात आहे.
या निर्णयावरून आता मुंबईकरांमध्ये आणि शहरी नियोजन क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सात वर्षांपूर्वी जेव्हा हा उड्डाणपूल बांधण्यात आला, तेव्हा भविष्यातील प्रकल्पांचा विचार का केला गेला नाही? शहर विकासाच्या नावाखाली अशा प्रकारे आधी केलेल्या खर्चाचे अवमूल्यन करून प्रकल्पांचे पुनर्रचना करणे म्हणजे सार्वजनिक पैशांची उधळपट्टी नाही का?
याबाबत महापालिकेकडून दीर्घकालीन नियोजन, पारदर्शकता आणि प्रकल्प समन्वय वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिक आणि नागरी संस्थांच्या मते, भविष्यातील गरजांचा अंदाज न घेता घेतलेले निर्णय केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर लोकांचा प्रशासनावरचा विश्वासही डळमळीत करतात.
उड्डाणपूल तोडण्याची प्रक्रिया अद्याप औपचारिकपणे सुरू झालेली नसली तरी, कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्राथमिक अहवालात आणि आराखड्यात हा निर्णय स्पष्टपणे नमूद आहे. पुढील टप्प्यात या निर्णयाची अंमलबजावणी कधी व कशी होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.