मुंबई चौपाट्यांवर विसर्जनावेळी सावधान! स्टिंग रे आणि ब्लू जेलीफिशपासून सर्तक राहण्याचे आवाहन
मुंबई चौपाट्यांवर विसर्जनावेळी सावधान! स्टिंग रे आणि ब्लू जेलीफिशपासून सर्तक राहण्याचे आवाहन
गणेश विसर्जनावेळी मुंबईतील चौपाट्यांवर स्टिंग रे आणि ब्लू जेलीफिश प्रजातीच्या माशांचा धोका. मुंबई पालिकेने नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या असून प्रथमोपचार केंद्रे व जीवरक्षकांची व्यवस्था केली आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हजारो भक्त गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर जातील. मात्र, यंदा गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. चौपाट्यांवर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’ सारख्या समुद्री जीवांचा वावर वाढल्याने विसर्जनावेळी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर या जीवांचा वावर वाढल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळवले आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ विशेषतः संवेदनशील मानला जातो. या कालावधीत ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे यांसारखे समुद्री जीव समुद्रकिनाऱ्याजवळ आढळतात. गिरगाव, जुहू, वसोर्वा आदी चौपाट्यांवर विसर्जनावेळी नागरिकांचा मोठा जमाव होतो, त्यामुळे या भागात मत्स्यदंश होण्याची शक्यता जास्त आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व विभागांना समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. चौपाट्यांवर जीवरक्षक, वैद्यकीय कक्ष, तसेच १०८ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना मार्गदर्शक सूचना फलकांद्वारे आणि उद्घोषकांच्या माध्यमातून सतत सतर्क केले जात आहे.
स्टिंग रेच्या दंशामुळे पायाला आग झाल्यासारखे किंवा चटका लागल्यासारखे वाटते, तर जेलीफिशच्या दंशामुळे मोठ्या प्रमाणावर खाज सुटते. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरू नये. तत्काळ नजीकच्या वैद्यकीय केंद्रात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत. दंश झालेल्या जागेवर स्वच्छ पाण्याने धुवावे, बर्फ लावावा, मात्र जखम चोळू नये. जेलीफिशचा दंश झाल्यास शरीराला चिकटलेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावेत.
पालिका प्रशासनाने नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत. विसर्जनावेळी उघड्या अंगाने समुद्रात जाणे टाळावे, पायाला संरक्षण मिळावे म्हणून गमबूटांचा वापर करावा. लहान मुलांना पाण्यात उतरू देऊ नये. गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी नेमणूक केलेल्या जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच चौपाट्यांवर उपलब्ध असलेल्या नागरी गणेशोत्सव प्रणालीचा वापर करावा.
मुंबईची किनारपट्टी ही संरक्षित किनारपट्टी असल्याने येथे समुद्री प्रवाह कमी असतो. त्यामुळे जेलीफिश आणि स्टिंग रे यांसारख्या जलचरांचे संवर्धन आणि संगोपन होते. किनारपट्टीवर मुबलक प्लवंगसदृश खाद्य उपलब्ध असल्याने या जीवांचा वावर वाढतो. त्यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नागरिकांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीभावाचा सण असला तरी सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व आहे. पालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करून आणि जीवरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन केल्यास धोके टाळता येतील. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी सतर्क राहून हा उत्सव सुरक्षित आणि आनंदमय करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.