मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरू होणार! गौरी विसर्जनाच्या आधी प्रवाशांना दिलासा
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरू होणार! गौरी विसर्जनाच्या आधी प्रवाशांना दिलासा
मुंबई ते विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड रो-रो फेरी सेवा अखेर सुरू होणार आहे. गौरी विसर्जनापूर्वी सेवा सुरु होईल, ज्यामुळे प्रवाशांना कोकण प्रवासासाठी अवघ्या ६ तासांचा वेळ लागणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २६ ऑगस्ट २०२५ : मुंबई ते कोकण प्रवासासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या रो-रो फेरी सेवेच्या सुरुवातीबाबत अखेर महत्वाची माहिती समोर आली आहे. विजयदुर्ग, देवगड आणि सिंधुदुर्ग याठिकाणी प्रवाशांना थेट पोहोचवणारी ही सेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र महासंचालनालयाकडून परवानगी मिळण्यात झालेल्या विलंबामुळे ही सेवा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. आता मात्र ही सेवा गौरी विसर्जनाच्या आधी सुरू होणार असल्याचे कळाले आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि पारंपरिक असा सण आहे. लाखो लोक आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे, बस आणि खासगी वाहनांवर अवलंबून असतात. मात्र प्रत्येक वर्षी तिकीटांची कमतरता, वाहतूक कोंडी आणि लांबचा प्रवास यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कोकण रेल्वेने प्रवास करताना मुंबईहून सिंधुदुर्गपर्यंत १३ ते १४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पण या रो-रो फेरी सेवेच्या माध्यमातून तोच प्रवास आता अवघ्या ६ तासांत पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे या सेवेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचा पुढाकार घेतला होता. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र परवानगीतील विलंबामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला. आता मात्र गौरी विसर्जनाच्या आधी ही सेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गहून पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे.
कोकणातील देवगड, मालवण, विजयदुर्ग आणि राजापूर या भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. पर्यटनासाठी देखील ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. कारण या भागांमध्ये गणेशोत्सवाच्या काळातच नव्हे तर वर्षभर देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान सेवा मिळणार आहे.
सागरी महामंडळानेही विश्वास व्यक्त केला आहे की या सेवेचा प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळेल. कारण प्रवासाच्या कालावधीतील मोठी बचत, सोयीस्कर सुविधा आणि सुरक्षितता यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने या सेवेकडे वळतील. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई आणि कोकण यांमधील अंतर प्रत्यक्षात कमी होणार असून प्रवाशांना वेळ आणि श्रमांची बचत होणार आहे.
गणेशोत्सवात गावी जाणाऱ्यांसाठी ही सेवा एक मोठा दिलासा ठरणार आहे. वाहतूक कोंडी आणि रेल्वे विलंबामुळे प्रवासात अडथळे येतात, मात्र आता समुद्रमार्गाने रो-रो सेवेच्या माध्यमातून प्रवास अधिक सुखकर आणि जलद होईल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या नव्या उपक्रमाचा मोठा फायदा मिळणार आहे.