मुंबई लोकलमध्ये बदलांची तयारी: २०२६ पासून येणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या सामान्य गाड्या

0
मुंबई लोकलमध्ये बदलांची तयारी: २०२६ पासून येणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या सामान्य गाड्या

मुंबई लोकलमध्ये बदलांची तयारी: २०२६ पासून येणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या सामान्य गाड्या

२०२६ पासून मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या सामान्य लोकल ट्रेन धावणार; अपघात कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय.

सायली मेमाणे

पुणे १० जून २०२५ : मुंब्रा स्थानकाजवळ नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, मुंबई उपनगरीय रेल्वे व्यवस्थेत सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांच्यात झालेल्या बैठकीत २०२६ पासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या सामान्य लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला आहे.

सध्या मुंबईत धावणाऱ्या सामान्य लोकल गाड्यांमध्ये उघडे दरवाजे असल्याने चढताना आणि उतरताना अपघात होण्याची शक्यता वाढते. स्वयंचलित दरवाजे बसवल्यास अपघात टाळता येतील, मात्र त्यातून होणाऱ्या वायुवीजनाच्या अडचणीही लक्षात घेऊन रेल्वेने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक डिझाइनऐवजी नव्या रचनेच्या डब्यांमध्ये दरवाज्यांमध्ये हवेशीर पट्ट्या (लूव्हर्स) असतील, जे डब्यात ताजी हवा खेळती ठेवतील. शिवाय डब्यांच्या छतावर वेंटिलेशन युनिट्स बसवली जातील, जे डब्यातील वायुवीजनाचा दर्जा कायम राखतील.

या नव्या डब्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेकांशी जोडलेले असतील. यामुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहजगत्या जाता येईल, आणि त्यामुळे गर्दीचा ताण एका डब्यावर राहणार नाही. अशा प्रकारची सुविधा सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे, आणि तीच पद्धत आता मुंबई लोकलसाठी आणली जाणार आहे.

ही नवी लोकल ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार केली जाणार असून, त्यानंतर आवश्यक चाचण्या आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून ती जानेवारी २०२६ मध्ये सेवा देण्यास सज्ज होईल. ही ट्रेन वातानुकूलित नसलेली असून सामान्य प्रवाशांसाठी तयार केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या २३८ वातानुकूलित लोकलच्या योजनांव्यतिरिक्त ही स्वतंत्र व्यवस्था असेल.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बदलामुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक बनेल. मुंबईसारख्या महानगरामध्ये दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात, त्यामुळे ही सुधारणा एक मोठे सकारात्मक पाऊल मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed