मुंबई मेट्रो वन मार्गिकेने ११ वर्षांत १११ कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान दररोज लाखो प्रवासी मेट्रोचा वापर करत असून, ही सेवा मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचे महत्त्वाचे साधन ठरली आहे.
सायली मेमाणे
पुणे : 9 जून २०२५ : मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ मार्गिकेने ८ जून २०१४ रोजी प्रवाशांसाठी सेवा सुरू केली होती. आज या मार्गिकेला ११ वर्षे पूर्ण झाली असून या काळात मेट्रो वनने एकूण १११ कोटी प्रवाशांची ने-आण केली आहे. ही सेवा मुंबई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणीत क्रांतिकारक ठरली आहे. सध्या दररोज जवळपास पाच लाख नागरिक या मार्गावरून प्रवास करत आहेत. मेट्रो वनने आतापर्यंत १६ मेट्रो गाड्यांच्या माध्यमातून सुमारे १२ लाख ६६ हजार फेऱ्या पूर्ण केल्या असून, एकूण १ कोटी ४५ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. घाटकोपर हे या मार्गिकेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे, जिथून एकूण २९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याखालोखाल अंधेरी स्थानकातून २३ कोटी, साकीनाका स्थानकातून ११ कोटी, मरोळ नाका स्थानकातून ९ कोटी, चकाला स्थानकातून ७.८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. सर्वांत कमी प्रवासी जागृती नगर स्थानकातून प्रवास करत असून, आतापर्यंत १.८ कोटी प्रवाशांनी या स्थानकाचा वापर केला आहे. मेट्रो वनची स्थापना रिलायन्स इन्फ्राच्या पुढाकाराने PPP तत्त्वावर करण्यात आली असून, या प्रकल्पात रिलायन्सचा ७४ टक्के आणि MMRDAचा २६ टक्के हिस्सा आहे. सुरुवातीला प्रतिदिन ६.५ लाख प्रवाशांचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ही संख्या अजून गाठलेली नाही. तरीही मेट्रो वनने मुंबईकरांसाठी एक विश्वासार्ह आणि वेळ वाचवणारी प्रवास सेवा उपलब्ध करून दिली आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा दिवसेंदिवस अधिक महत्त्वाची ठरत आहे. मेट्रो २, मेट्रो ७ आणि अन्य मार्गिकांच्या विस्तारासह मेट्रो वनचा अनुभव भविष्यातील योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे.