धनकवडी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार रोहित आढाव आणि त्याच्या साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून ३०,००० रुपयांची दुचाकी जप्त.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २६ जुलै २०२५ : पुणे | सहकारनगर पोलीस स्टेशन अंतर्गत धनकवडी परिसरात घडलेल्या वाहन तोडफोड प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत गुन्हेगार रोहित आढाव आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. या आरोपींनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा लाकडी बांबू आणि दगडाने फोडत, नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती.
२३ जुलै २०२५ रोजी फिर्यादीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की काही अज्ञात इसमांनी “आम्ही धनकवडीचे भाई आहोत” असे ओरडत मारुती सियाज आणि इतर वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणी गुन्हा रजि. क्र. ३००/२०२५ नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की आरोपी रोहित आढाव नवले ब्रिज जवळ येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून रोहित आणि त्याचा साथीदार सुधीर सावंत यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात तीन अल्पवयीन साथीदारांचा देखील सहभाग होता.
अतिरिक्त तपासानंतर आरोपींकडून ३०,००० रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली असून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमांखाली आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पो.नि. सुरेखा चव्हाण आणि अंमलदारांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी जेणेकरून शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter