लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे पकडलं. आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल. तपशील वाचा.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २६ जुलै २०२५ :पुणे शहरातील लष्कर व कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, CCTV फुटेजचे सखोल विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली. युनियन बँक ऑफ इंडिया, कॅम्प जवळील कार्यालयात १५ जुलै रोजी झालेल्या चोरीच्या प्रयत्नात अज्ञात इसमाने खिडकीतून प्रवेश करत तिजोरी हलवून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली होती. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने लष्कर ते फुरसुंगी दरम्यानच्या CCTV फुटेजची बारकाईने पाहणी केली. पोलीस अंमलदार लोकेश कदम व सागर हराळ यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने आरोपींनी वापरलेले वाहन ओळखले आणि रामटेकडी परिसरात सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) आणि ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) हे आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी हडपसर, वानवडी व लोणीकंद पोलीस ठाण्यात विविध चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
या टोळीने लष्कर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ५६/२०२५ आणि कोंढवा पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २८३/२०२५ (भा.दं.वि. कलम ३०५, ३३१(२)(३)(४)) अंतर्गत गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुलकुमार नवधीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. तपासात PSI राहुल घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण, लोकेश कदम, सागर हराळ आणि अमोल कोडीलकर यांचा सक्रिय सहभाग होता.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा घालता येईल.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter