• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभाग, ३२ नगरसेवक; मसुदा जिल्हा प्रशासनाकडे सादर

Jul 26, 2025
फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभागांची रचना; ३२ नगरसेवकांची निवड होणारफुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभागांची रचना; ३२ नगरसेवकांची निवड होणार

पुण्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभागांचा आणि ३२ नगरसेवकांचा मसुदा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

सायली मेमाणे

पुणे २६ जुलै २०२५ : पुणे, २५ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकांसोबतच पुण्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठीही निवडणूक होणार आहे. यासाठी नगर परिषद प्रशासनाने तयार केलेला प्रभाग रचनेचा मसुदा जिल्हा प्रशासनाकडे अंतिम तारखेला म्हणजे शुक्रवारी सादर करण्यात आला आहे.

या मसुद्यानुसार, एकूण १६ प्रभाग तयार करण्यात आले असून प्रत्येक प्रभाग दोन उपविभागांचा समावेश करून बनवण्यात आला आहे. परिणामी एकूण ३२ नगरसेवकांची निवड या नगर परिषदेसाठी होणार आहे.

फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, करांचा बोजा आणि मूलभूत सुविधा न मिळाल्याच्या कारणांवरून स्थानिक ग्रामस्थांनी हा समावेश रद्द करून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत केली होती.

या मागणीनंतर शिंदे सरकारने फुरसुंगी-उरुळी देवाचीसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ३१ मार्च २०२३ रोजी नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जिवलिकर यांनी यासंबंधीचा अधिसूचना मसुदा प्रसिद्ध केला. त्यावर तब्बल ४,५०० हून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यावर अहवाल तयार करून जून २०२३ मध्ये राज्य सरकारकडे सादर केला होता. राज्य शासनाने त्यानंतर या नगर परिषदेच्या स्थापनेला अंतिम मंजुरी दिली.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून या निवडणुका चार टप्प्यांत घेण्यात येणार आहेत.

फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पुणे पल्सशी बोलताना सांगितले की, मसुदा जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून तो आता राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर नागरिकांकडून सूचनां व हरकती मागवण्यात येतील.

🔹 महत्त्वाच्या बाबी:

  • प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे.
  • एकूण १६ प्रभाग, प्रत्येकात दोन उपविभाग.
  • एकूण ३२ नगरसेवक निवडले जाणार.
  • जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडून अंतिम मान्यता मिळाल्यावर प्रभाग रचना जाहीर होणार.

🔹 २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या:

  • एकत्रित लोकसंख्या : ~७५,०००
  • फुरसुंगी : ६६,००२
  • उरुळी देवाची : ९,४०३

‘ब’ वर्गातील नगर परिषदेसाठी किमान लोकसंख्येची अट ७५,००० पूर्ण झाल्यामुळे यासाठी स्वतंत्र परिषद स्थापन करण्यात आली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune