• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

खराडीत मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एकजण अटकेत; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Jul 26, 2025
खराडीत ६.२३ लाखांचा मेफेड्रोन जप्त; अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी आरोपी अटकेतखराडीत ६.२३ लाखांचा मेफेड्रोन जप्त; अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी आरोपी अटकेत

पुणे शहरातील खराडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ६.२३ लाखांचा मेफेड्रोन (एम.डी.) आणि इतर मुद्देमालासह २० वर्षीय आरोपीला अटक केली. NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे २६ जुलै २०२५ : पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खराडी परिसरातून मेफेड्रोन (एम.डी.) या प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना केली.

पोलिसांना स्वामी समर्थ प्लाझा बिल्डिंगजवळ, थिटे वस्ती, काळुबाई नगर परिसरात केटीएम मोटारसायकलवर राँग साईडने भरधाव वेगाने जाणारा एक इसम संशयास्पद वाटला. मोटारसायकलवर नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने थांबवले आणि चौकशी केली.

चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे २३.१८ ग्रॅम मेफेड्रोन, ज्याची किंमत सुमारे ४ लाख ६३ हजार ६०० रुपये इतकी आहे, असे आढळून आले. तसेच १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल, ६० हजारांचा मोबाईल फोन, पारदर्शक प्लास्टिक पिशव्या आणि काळ्या रंगाचे पॉकेट पाऊच असा एकूण ६.२३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हर्षवर्धन राहुल धुमाळ असून तो चंदननगर, खराडी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध खराडी पोलीस स्टेशन येथे NDPS अ‍ॅक्टच्या कलम ८(क) आणि २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे आणि पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, खराडी पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार नाणेकर यांनी संयुक्तरीत्या ही कार्यवाही पार पाडली. खराडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनीही या कारवाईत सहकार्य केले. पुण्यात अंमली पदार्थांचा वाढता प्रवाह रोखण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही तातडीची आणि प्रभावी कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune