सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाच मागणी प्रकरणात अटकेत

0
सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच प्रकरण

सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच प्रकरण

सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना २४ मजली इमारतीच्या परवाना मंजुरीसाठी ७ लाखांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

सायली मेमाणे

पुणे १० जून २०२५ : सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विजय साबळे यांना लाच मागणी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई एका २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाख रुपये लाच मागितल्याच्या आरोपावरून करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तानाजी रूईकर यांच्या कंपनीकडून सांगलीतील एका मोठ्या निवासी प्रकल्पासाठी परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेत सहाय्य मिळावे म्हणून महापालिकेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. संबंधित परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे यांनी कथितपणे १० लाख रुपयांची मागणी केली होती. पुढे ही रक्कम तडजोडीने ७ लाख रुपयांवर आली.

१७ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्या वेळी साबळे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. तांत्रिक आणि कायदेशीर तपासानंतर वरिष्ठांच्या मंजुरीने ही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात नूतन उपअधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोमवारी महापालिका कार्यालयातून साबळे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील सुनावणीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कारवाईनंतर सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी या अटकेचं स्वागत केलं आहे. काही नागरिकांनी महापालिकेसमोर फटाके फोडून आनंदही व्यक्त केला.

वैभव साबळे हे मूळचे साताऱ्याचे असून सध्या सांगली शहरात धामणी रोडवरील ग्रीन एकर्स या गृहनिर्माण प्रकल्पात वास्तव्यास होते. अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगली आणि सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकून झडती घेतली आहे.

साबळे यांनी लाच मागणी करताना ती रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचा उल्लेख केला होता, मात्र पडताळणीत त्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध थेट पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र या मुद्द्यावर समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईचे नेतृत्व करणारे अनिल कटके हे नुकतेच मुंबईहून सांगलीमध्ये बदलीवर आलेले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांत ही कारवाई केली आहे. त्यामुळे सांगली ACB च्या पुढील कामकाजावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *