रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: ये-जा तिकिटांवर 20% सवलत, जाणून घ्या राऊंड ट्रिप पॅकेजची माहिती

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: ये-जा तिकिटांवर 20% सवलत, जाणून घ्या राऊंड ट्रिप पॅकेजची माहिती
भारतीय रेल्वेची नवी राऊंड ट्रिप पॅकेज योजना सुरू. ये-जा तिकिटे एकाचवेळी बुक केल्यास परतीच्या प्रवासावर 20% सवलत. जाणून घ्या अटी, नियम आणि फायदे.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ :भारतीय रेल्वेने सण-उत्सवांच्या काळात प्रवाशांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राऊंड ट्रिप पॅकेज’ योजना सुरू करण्याची घोषणा केली असून, या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासाच्या मूळ किमतीवर 20% सवलत मिळणार आहे. ही सुविधा फक्त त्या प्रवाशांसाठी आहे, जे येण्याचे आणि जाण्याचे तिकीट एकाचवेळी, एकाच नावाने आणि एकाच माहितीसह बुक करतील. दोन्ही तिकीटे एकाच क्लासची असावी आणि एकाच स्टेशनवरून सुरू होऊन त्याच स्टेशनपर्यंतची असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जाण्याचे तिकीट आधी बुक करावे लागेल आणि नंतर ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’ वापरून परतीचे तिकीट बुक करता येईल. ही योजना सर्व क्लास आणि सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी लागू आहे, ज्यामध्ये स्पेशल ट्रेनचाही समावेश आहे, मात्र ‘फ्लेक्सी फेअर’ असलेल्या गाड्यांमध्ये ही सुविधा मिळणार नाही. दोन्ही तिकीटे एकाच माध्यमातून — ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवरून — बुक करणे बंधनकारक आहे.
परतीचे तिकीट बुक करताना ‘अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड’ (ARP) नियम लागू होणार नाही. मात्र, अट अशी आहे की दोन्ही तिकिटे कन्फर्म असावीत, बुकिंगनंतर कोणताही बदल किंवा रिफंड मिळणार नाही आणि अन्य कोणतीही सवलत, व्हाउचर किंवा पास लागू होणार नाही.
रेल्वेने ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे, ज्याचा उद्देश सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करणे, प्रवाशांना सोय करणे आणि तिकिट आरक्षण सुलभ करणे हा आहे. या योजनेमुळे रेल्वेच्या दोन्ही दिशांनी वापर वाढवून गर्दीचे समान वितरण साध्य होईल अशी अपेक्षा आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter