रॉबर्ट वाड्रा अडचणीत; ED च्या आरोपपत्रात शिकोहपूर जमीन घोटाळ्यातून 58 कोटींचा खुलासा
रॉबर्ट वाड्रा अडचणीत; ED च्या आरोपपत्रात शिकोहपूर जमीन घोटाळ्यातून 58 कोटींचा खुलासा
शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ED च्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती. बेकायदेशीररीत्या 58 कोटींची कमाई, अनेक मालमत्ता जप्त.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हरियाणातील गुरुग्रामच्या शिकोहपूर गावातील जमीन व्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्याबाबत गंभीर आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. ईडीच्या तपासानुसार, या प्रकरणातून वाड्रा यांनी 58 कोटी रुपये बेकायदेशीररीत्या कमावल्याचे समोर आले आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये हरियाणा पोलिसांनी गुरुग्रामच्या खेडकी दौला पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. यात रॉबर्ट वाड्रा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा, डीएलएफ कंपनी, ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रा. लि. यांच्यासह इतरांवर फसवणूक, कटकारस्थान आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले.
तपासात आढळले की स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (SLHPL) या कमी भांडवल असलेल्या कंपनीने 3.5 एकर जमीन केवळ ₹7.50 कोटींना विकत घेतली, जिची खरी बाजार किंमत ₹15 कोटी होती. विक्री करारपत्रात पेमेंट चेकद्वारे झाले असा खोटा उल्लेख करण्यात आला, मात्र चेक कधीच क्लिअर झाला नाही. याशिवाय सुमारे ₹45 लाखांच्या स्टॅम्प ड्युटीपासून बचाव करण्यासाठी खोटी माहिती देण्यात आली.
आरोपांनुसार, रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रभावाच्या मोबदल्यात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजला गृहनिर्माण परवाना मिळवून देण्यासाठी जमीन हस्तांतरित करण्यात आली. नंतर ही जमीन व्यावसायिक परवाना मिळवून, दबाव आणि फाइल फेरफार करून DLF कंपनीला ₹58 कोटींना विकण्यात आली. यातील ₹5 कोटी ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रा. लि. आणि ₹53 कोटी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मार्फत वाड्रा यांच्या खात्यात आले. हा निधी मालमत्ता खरेदी, गुंतवणूक आणि कर्जफेडीसाठी वापरण्यात आला.
ईडीने या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत कलमे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 423 चा समावेश केला आहे. आरोप सिद्ध झाल्यास 3 ते 7 वर्षांची शिक्षा आणि बेकायदेशीर मालमत्ता जप्त होऊ शकते. आतापर्यंत ₹38.69 कोटी किमतीच्या 43 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या असून यात बिकानेर, गुरुग्राम, मोहाली, अहमदाबाद, नोएडा आणि फरिदाबाद येथील जमिनी, फ्लॅट्स व व्यावसायिक युनिट्सचा समावेश आहे.