लग्नाच्या दोन वर्षानंतर परिणीती चोप्रा आई होणार, राघव चड्ढासह गोड पोस्ट शेअर
लग्नाच्या दोन वर्षानंतर परिणीती चोप्रा आई होणार, राघव चड्ढासह गोड पोस्ट शेअर
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी प्रेग्नंसीची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जोडपे लवकरच आई-बाबा होणार आहेत. बॉलिवूड आणि राजकारण क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑगस्ट २०२५ : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी अखेर चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर हे जोडपे आता पालकत्व स्वीकारणार असून, परिणीती लवकरच आई होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. या दोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना या नव्या प्रवासात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे.
सोमवारी सकाळी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक संयुक्त पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये बाळाच्या छोट्या पावलांचे गोंडस ठसे आणि त्यावर लिहिलेले “१ + १ = ३” असा संदेश दिसत आहे. या पोस्टसोबत दोघांनी लिहिले आहे – “आमचे छोटेसे जग, लवकरच येत आहे.” ही पोस्ट काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. चाहत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या गोड जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
हुमा कुरेशीने “अभिनंदन” असे लिहून शुभेच्छा दिल्या, तर भूमी पेडणेकरने तीन रेड हार्ट इमोजी टाकले. सोनम कपूरनेही “अभिनंदन प्रिये” असे लिहून आनंद व्यक्त केला. याशिवाय, टीना दत्ता आणि अनेक कलाकारांनीही कमेंट सेक्शनमधून अभिनंदनाचा वर्षाव केला. चाहत्यांनी देखील परिणीती आणि राघव यांना “ड्रीम कपल” म्हणत त्यांच्या नवीन जीवनप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या गोड घोषणेमुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, राघव चड्ढा यांनी नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावताना “लवकरच मोठी बातमी मिळेल” असे संकेत दिले होते. त्यावेळी प्रेक्षकांनी या गोष्टीवर तर्कवितर्क लावले होते आणि आता त्यांच्या बोलण्याला पूर्णविराम मिळाला आहे.
परिणीती आणि राघव यांचा विवाह २४ सप्टेंबर २०२३ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या भव्य सोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकार, राजकीय नेते आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या लग्नाचा प्रत्येक क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर दोघेही अनेकदा एकत्र सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसले आणि चाहत्यांनी त्यांना “पॉवर कपल” म्हणून संबोधले.
आता, या दोघांचे छोटेसे कुटुंब पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूडमध्ये आई होणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत परिणीतीचे नावही सामील झाले आहे. चाहत्यांसोबतच तिचे कुटुंब, मित्रपरिवार आणि सहकारी कलाकार देखील या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहेत.