लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 2025: राज्यभरात मिरवणुका व उत्साह
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 2025: राज्यभरात मिरवणुका व उत्साह
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महाराष्ट्रात विविध भागांत उत्साहाचे वातावरण, मिरवणुका, साहित्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध समाजघटकांमधून त्यांच्या कार्याची आठवण ठेवत श्रद्धा, आदरभाव आणि सन्मानपूर्वक ही जयंती साजरी केली जात आहे. विशेषतः दलित, कामगार, शेतकरी आणि वंचित वर्गासाठी आवाज उठवणाऱ्या अण्णाभाऊंच्या कार्याचा प्रभाव आजही अनेक पिढ्यांवर कायम आहे.
पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूरसारख्या शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, भव्य मिरवणुकांच्या माध्यमातून त्यांचे विचार जनमानसात पोहोचवले जात आहेत. ढोलताशा, लेझीम पथक, पारंपरिक लोककलांचा वापर करत तरुणाई मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. काही ठिकाणी अण्णाभाऊंच्या साहित्यवाचनाच्या कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
राजकीय स्तरावरही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत विविध नेत्यांनी सामाजिक समतेसाठी त्यांनी उभारलेली चळवळ आणि त्यांच्या साहित्यातून उमटलेला परिवर्तनाचा संदेश याची आठवण करून दिली आहे.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणजे केवळ एक स्मरण दिन नाही, तर हा दिवस सामाजिक न्याय, साहित्यातील विद्रोह आणि परिवर्तनाचा आवाज यांचा पुनःप्रत्यय देणारा ठरतो.