लोणार सरोवराची पाणीपातळी वाढ; जैवविविधतेला धोका, हायकोर्टाची गंभीर दखल

0
लोणार सरोवराची पाणीपातळी वाढ; जैवविविधतेला धोका, हायकोर्टाची गंभीर दखल

लोणार सरोवराची पाणीपातळी वाढ; जैवविविधतेला धोका, हायकोर्टाची गंभीर दखल

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे 22 जानेवारी २०२६ : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणीपातळीत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले असून या घटनेमुळे पर्यावरण, पुरातन वारसा आणि जैवविविधतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सरोवराच्या सभोवतालच्या चार मुख्य जलस्रोतांमधून आणि झऱ्यांमधून पाण्याचा प्रवाह अखंड सुरू असल्याने सरोवराची पातळी तब्बल १५ ते २० फूटांनी वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वाढत्या पाण्यामुळे सरोवराच्या काठावरील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली असून धार्मिक व ऐतिहासिक वारशाला मोठा फटका बसला आहे.

लोणार सरोवराच्या काठावर असलेली महादेवाची प्राचीन मंदिरे पूर्णतः किंवा अंशतः पाण्याखाली गेली आहेत. जगप्रसिद्ध कमळजा माता मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरासमोरील दीपस्तंभ, जो पूर्वी पूर्णपणे दिसत असे, तो आता अर्धा पाण्यात बुडालेला दिसत आहे. या दृश्यांमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून हस्तक्षेप केला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी जनहित याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने ॲडव्होकेट मोहित खजानची यांची ‘अॅमिकस क्युरी’ म्हणून नियुक्ती करत सात दिवसांत सविस्तर याचिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे लोणार सरोवराच्या संरक्षणासाठी कायदेशीर पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे दुर्मीळ सरोवर असून त्याची रचना आणि रासायनिक वैशिष्ट्ये जगभरातील संशोधकांसाठी महत्त्वाची आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गोड्या पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणावर सरोवरात मिसळत असल्याने येथील नैसर्गिक खारटपणा धोक्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाण्यात आता मासे दिसू लागले आहेत, जे खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या नैसर्गिक परिसंस्थेसाठी घातक मानले जातात.

शासकीय आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील भूजल तज्ज्ञ प्राध्यापक अशोक तेजनकर आणि तहसीलदार भूषण पाटील यांनी सरोवराची पाहणी केली आहे. मात्र, पाणीपातळी वाढण्यामागचे नेमके वैज्ञानिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी सखोल संशोधनाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले असून जागतिक वारसा म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. देश-विदेशातील संशोधक, पर्यटक आणि अभ्यासक या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी येथे भेट देत असतात. त्यामुळेच या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असून उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका भविष्यातील संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *