वाघोली पोलिसांची मोठी कारवाई: २८ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक
वाघोली पोलिसांची मोठी कारवाई: २८ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक
पुणे शहरातील वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गणेशोत्सव काळात २८ किलो गांजा, चारचाकी गाडी व मोबाईलसह १०.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपी विलेश धारासिंग पावरा अटकेत.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ३० ऑगस्ट २०२५ : पुणे शहर पोलिसांनी गणेशोत्सव काळात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर मोठा आळा घालत वाघोली परिसरातून २८ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी विलेश धारासिंग पावरा याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल १०.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली आहे.
दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिसांचे तपास पथक गणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना टिटॉज हॉटेलजवळ संशयास्पद कार आढळली. पोलिस अंमलदार प्रदिप मोटे यांनी वाहनाला थांबवले असता, कारमधील एक इसम घाईघाईने उतरून पसार झाला. त्यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. त्याची ओळख विलेश धारासिंग पावरा (वय २२, रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी पटली.
यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली असता २८.८०२ किलो गांजा, मोबाईल फोन व चारचाकी गाडी असा एकूण १०.८६,०४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. गांजाची किंमत बाजारभावानुसार ५.७६ लाख रुपये असून मोबाईल व गाडीची किंमत मिळून उर्वरित रक्कम इतका जप्तीचा आकडा पोहोचला आहे. या संदर्भात वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अंतर्गत आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या धाडसी कारवाईत अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने मोठा वाटा उचलला. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, अंमलदार रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर मोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे आणि सिदनाथ ढगळे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने अंमली पदार्थ विक्रेत्यांची हालचाल वाढते, याची दखल घेत पोलिसांनी कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. अवैध गांजा विक्री रोखण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलिसांची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद मानली जात आहे.
या प्रकरणामुळे अंमली पदार्थांच्या रॅकेटविरोधात पुणे पोलिसांचे सातत्याने सुरू असलेले प्रयत्न आणखी अधोरेखित झाले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी हालचालींची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वाघोली परिसरातील या धाडसी कारवाईमुळे पोलिसांची गुन्हेगारीवरची पकड अधिक मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे.