वारीत मेकअप, फोटोशूट आणि दिखावा? शुभांगी गोखले यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी पंढरपूर वारीतल्या ‘शोऑफ’ संस्कृतीवर नाराजी व्यक्त करत मेकअप करून भाकऱ्या भाजणाऱ्यांना फटकारलं आहे. वाचा नेमकं काय म्हणाल्या शुभांगी गोखले.
सायली मेमाणे
२५ जून २०२५ : मुंबई – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी पंढरपूरच्या वारीमधील ‘शोऑफ संस्कृती’वर आपल्या खास शैलीत रोष व्यक्त केला आहे. मेकअप करून फोटोशूट, मोठ्या गाड्यांतून वारीत येणं, जबरदस्तीने भाकऱ्या भाजणं आणि विठूरायाच्या भक्तीला ‘सोशल मीडिया स्टंट’ बनवणं — यावर शुभांगी यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.
“वारी वर्षानुवर्षं शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं वाटायची, मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या… काय भक्तीपूर्ण वातावरणाचा विचका करायचा! कशासाठी?” — असं ती त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी निसर्गातल्या ‘काजवा महोत्सवा’सारख्या घटनांवर देखील भाष्य करत मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची होणारी हानी अधोरेखित केली. “बुटांनी जमीन तुडवत, टॉर्चेसचा प्रकाश न् बडबड करून निसर्गाची लयच बिघडवली जाते. हा खूनच आहे!” — अशीही संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
शुभांगी गोखले सोशल मीडियावर फारसे सक्रीय नसल्या तरीही सामाजिक आणि भावनिक विषयांवर त्या वेळोवेळी मत व्यक्त करत असतात. त्यांच्या या पोस्टमुळे अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली असून, ‘वारी ही भक्तीची आणि समर्पणाची परंपरा आहे, प्रदर्शनाची नव्हे’ असा सूर उमटताना दिसतो.
पंढरपूर वारी जशी भक्तीची, त्यागाची परंपरा आहे, तशीच तिचं पावित्र्यही जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे — असा संदेश या पोस्टमधून निघतो.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz