वैष्णो देवी भूस्खलनात 30 मृत; यात्रा स्थगित, भाविकांना सतर्कतेचा इशारा

0
वैष्णो देवी भूस्खलनात 30 मृत; यात्रा स्थगित, भाविकांना सतर्कतेचा इशारा

वैष्णो देवी भूस्खलनात 30 मृत; यात्रा स्थगित, भाविकांना सतर्कतेचा इशारा

जम्मू-काश्मीर वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनात 30 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. खराब हवामानामुळे यात्रा स्थगित; मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर.

सायली मेमाणे

पुणे २८ ऑगस्ट २०२५ : जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णो देवी मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत मृतांची संख्या 30 वर पोहोचली असून किमान 20 भाविक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही दुर्घटना प्रचंड पावसामुळे झाली. 27 ऑगस्टपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाले आणि त्यात यात्रेकरू अडकले. बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता, त्यानंतर पावसात थोडीशी उसंत मिळाली.

भूस्खलनामुळे तवी पूलाचेही मोठे नुकसान झाले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, “या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची माहिती दिली असून त्यांनी तत्काळ मदतीचे आश्वासन दिले आहे.”

या घटनेत 20 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी सांगितले की मृतांच्या कुटुंबीयांना वैष्णो देवी संस्थानाकडून प्रत्येकी लाख रुपयांची मदत दिली जाईल. मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठवण्याची तयारीही सुरू आहे.

भूस्खलन आणि पावसामुळे रस्त्यांची स्थिती धोकादायक असल्याने वैष्णो देवी यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. संस्थानाने भाविकांना इशारा देत सांगितले की, “खराब हवामान लक्षात घेऊन यात्रेचे नियोजन करावे.”

दरम्यान, पावसामुळे जम्मूतील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या घटनेच्या एक दिवस आधी 27 ऑगस्ट रोजी कठुआ भागात 22 जवानांना पूरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील चंदीगड-मनाली महामार्गालाही मोठे नुकसान झाले असून पंजाबमधील शाळा 30 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कटऱ्याचे जिल्हाधिकारी पीयूष धोत्रा यांनी ANI ला सांगितले की, “भूस्खलनानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पाच मृतदेह कम्युनिटी हेल्थ सेंटरवर आणले गेले आहेत, तर 10–11 जखमींवर उपचार सुरू आहेत.”

या दुर्दैवी घटनेमुळे लाखो भाविकांनी भेट देणाऱ्या वैष्णो देवी यात्रेवर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *