शाळेसाठी जीवघेणा प्रवास: यशोदा नदीच्या पुरात अडकले तीन विद्यार्थी; जीव वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

0
शाळेसाठी जीवघेणा प्रवास: यशोदा नदीच्या पुरात अडकले तीन विद्यार्थी

शाळेसाठी जीवघेणा प्रवास: यशोदा नदीच्या पुरात अडकले तीन विद्यार्थी

वर्धा जिल्ह्यात यशोदा नदीला पूर; तीन शाळकरी विद्यार्थी पाण्यात अडकले, स्थानिक प्रशासन व अग्निशमन दलाकडून वेळेवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू.

सायली मेमाणे

२६ जून २०२५ : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. डिगडोह परिसरात यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे तीन शाळकरी विद्यार्थी पाण्यात अडकले. हे विद्यार्थी शाळेतून घरी परत येत असताना अचानक नदीची पातळी वाढली आणि ते पुराच्या प्रवाहात अडकले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी उंच जागी थांबून आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वर्धा आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली. देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची टीम आणि जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले, यामुळे संपूर्ण परिसरात सुटकेचा निःश्वास टाकण्यात आला.

पाण्याच्या प्रवाहामुळे विद्यार्थी जेथे अडकले होते तिथे पोहोचणे कठीण होते. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. नागझरी येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी भाविष कापसे आणि डोगडोह येथील त्याचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर परतीच्या मार्गावर होते. डिगडोह येथे यशोदा नदीवर सध्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह थांबून साचत गेला आणि अचानक आलेल्या पावसामुळे नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्याचवेळी हे विद्यार्थी या पुलावरून जात होते आणि तेथेच ते पुरात अडकले.

घटनेची तीव्रता लक्षात घेता संपूर्ण यंत्रणेला सतर्क केले गेले. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस, नगरपालिका फायर ब्रिगेड, आणि जिल्हा बचाव पथक यांच्या समन्वयाने काम चालले. वेळेत केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, राज्यातील इतर भागांतही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. विशेषतः मेहकर तालुक्यात अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कास नदीच्या पुरामुळे मादणी आणि आरेगाव ही गावे वाशिम जिल्ह्यापासून पूर्णतः तुटली आहेत.

वाशिम जिल्ह्यातही मागील २० तासांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंप्री सरहद गावाजवळील उतावळी नदीला पूर आल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर शेकडो वाहनं अडकली असून प्रवाशांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे.

नांदेडमध्येही काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाला असून पैनगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी, सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण असला तरी सध्या स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत अचानक वाढलेल्या पावसामुळे जनतेची चिंता वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

सुदैवाने, देवळीतील विद्यार्थ्यांना वेळेत वाचवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु ही घटना राज्यभरात शाळेच्या सुरक्षिततेसाठी नव्याने प्रश्न उपस्थित करत आहे. या घटनांवरून शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासातील धोके स्पष्टपणे समोर येत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed