शिवेंद्रराजे भोसले रायगड दौऱ्यावर: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांची पाहणी
शिवेंद्रराजे भोसले रायगड दौऱ्यावर: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांची पाहणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज रायगड दौऱ्यावर असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा आढावा घेतला. पळस्पे फाटा येथून पाहणी सुरू.
सायली मेमाणे
पुणे ७ ऑगस्ट २०२५ :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सध्या राज्यात टीकेचा केंद्रबिंदू बनले असून या मार्गावरील अपघात, वाहतूककोंडी आणि कामाच्या संथ गतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम आजतागायत पूर्ण न झाल्यामुळे सरकारवर आणि संबंधित खात्यावर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा थेट आढावा घेण्याचा निर्धार केला आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सकाळी पळस्पे फाटा येथून या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली असून, त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांनी मार्गावरील विविध अडचणी, तांत्रिक अडथळे, निधी वितरण आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांनी महामार्गावर अपूर्ण पूल, डांबरीकरणाअभावी खड्डेमय रस्ते, वाहतूककोंडी आणि अपघातांची वाढती संख्या या बाबतीत मंत्री महोदयांच्या निदर्शनास अनेक समस्या आणून दिल्या.
या दौऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्णत्वास जावे आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जावे. कामातील रखडपट्टीमुळे पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि व्यापारी यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत मंत्र्यांचा दौरा हा एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. यामुळे आगामी काळात कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासन आणि जनतेकडून व्यक्त होत आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गावर होणारी वाहतूक वाढ लक्षात घेता काम लवकर पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.