सिंहगड रस्त्यावर सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण; 30 मिनिटांचा प्रवास फक्त 6 मिनिटांत

0
सिंहगड रस्त्यावर सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण; 30 मिनिटांचा प्रवास फक्त 6 मिनिटांत

सिंहगड रस्त्यावर सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण; 30 मिनिटांचा प्रवास फक्त 6 मिनिटांत

पुण्यात सिंहगड रस्त्यावर उभारलेला 2.6 किमी लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या पुलामुळे 30 मिनिटांचा प्रवास आता फक्त 6 मिनिटांत पूर्ण होणार असून वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

सायली मेमाणे

पुणे २ सप्टेंबर २०२५ : पुणे शहराच्या वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. विशेषतः सिंहगड रस्त्यावर धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक आणि नांदेड सिटी परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर तोडगा म्हणून पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर हा पूल वापरासाठी उपलब्ध झाला.

या उड्डाणपुलाचे उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुलामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार असून वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

उड्डाणपूल प्रकल्पाची सुरुवात 21 सप्टेंबर 2021 रोजी झाली होती. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर हा पूल तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 520 मीटर लांबीचा राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल 15 कोटींच्या खर्चातून उभारला गेला. दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा 2.1 किमी लांबीचा उड्डाणपूल 61 कोटींमध्ये तयार करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा 1.5 किमी लांबीचा पूल 42 कोटींमध्ये उभारला गेला. या तीनही टप्प्यांसाठी एकूण 118.37 कोटी रुपयांचा खर्च झाला.

या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ वाचणार आहे. पूर्वी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या 2.6 किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी जवळपास 30 मिनिटांचा कालावधी लागत होता. मात्र नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास केवळ 5 ते 6 मिनिटांत पूर्ण होणार आहे. वाहतुकीचा ताण कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणावर होणारा ताण देखील घटेल.

उड्डाणपुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन करण्यात आले आहे. दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूक क्षमता, प्रशस्त पदपथ, पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच दुभाजकाचे सुशोभीकरण CSR अंतर्गत दोन एजन्सींमार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील पाच वर्षे त्यांच्याच माध्यमातून केली जाणार आहे.

पुणेकरांसाठी हा उड्डाणपूल म्हणजे दिलासा ठरणार आहे. शहरातील दैनंदिन वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल. या प्रकल्पामुळे सिंहगड रस्ता परिसरातील जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *