सुनिल गावस्कर आणि गौतम गंभीर : “राजीनामा मागणाऱ्यांनी आधी हे प्रश्न विचारावेत”
Sunil Gavaskar on Gautam Gambhir: “राजीनामा मागणाऱ्यांनी आधी हे प्रश्न विचारावेत”
सुनिल गावस्कर ने गौतम गंभीरच्या समर्थनात टीकाकारांना सवाल विचारले. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पराभवानंतर गंभीरच्या राजीनाम्याची मागणी वाढत असताना गावस्कर आणि अश्विन यांनी कोचची बाजू मांडली.
सायली मेमाणे
पुणे २८ नोव्हेंबर २०२५ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन कसोटी मालिकांमध्ये क्लीन स्वीप झाल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियासह अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट विश्लेषकांनी गंभीर यांच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी तर टेस्ट फॉर्मेटसाठी वेगळा कोच हवा, अशी मागणीही जोरात केली. या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या वादाला थेट उत्तर देत टीकाकारांना काही तीक्ष्ण प्रश्न विचारले आहेत.
गावस्कर म्हणाले की, “टीम हरली म्हणजे त्यासाठी फक्त एकट्या कोचला जबाबदार धरणे ही चुकीची पद्धत आहे. मैदानात खेळाडूंनाच प्रदर्शन करावं लागतं. कोच सल्ला देतो, रणनीती आखतो, पण त्या रणनीतीची अंमलबजावणी खेळाडूंच्या हातात असते.” गावस्कर यांनी स्पष्ट केले की टीम इंडियाच्या पराभवामध्ये गंभीर यांची चूक नक्कीच एकटी नाही, तर अनेक खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली नाही.
गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले आहेत. या विजयांच्या वेळी सर्वांनी गंभीर यांच्या नेतृत्वाचं कौतुक करण्याऐवजी आज पराभवानंतर तेच लोक राजीनाम्याची मागणी करत आहेत, असे गावस्करांनी ठासून सांगितले. “त्या वेळी कोणी असा म्हणालं का की गंभीरचा कॉन्ट्रॅक्ट लाइफटाईम करा? विजयावर कोणी क्रेडिट देत नाही, पण पराभव झाला की कोचला बाहेर काढा — ही सवय बदलायला हवी,” अशा शब्दांत गावस्करांनी टीकाकारांना सुनावले.
गावस्कर यांनी इतर देशांतील उदाहरणेही दिली. “न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकुलम इंग्लंडच्या तिन्ही फॉर्मेटचा कोच आहे. जगभरात एकच कोच अनेक फॉर्मेट्स सांभाळतो. मग भारतामध्येच अचानक टेस्टसाठी वेगळा कोच हवा, अशी मागणी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, पराभवानंतर कोचला दोष देण्यापेक्षा खेळाडूंनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या का, याचा विचार अधिक महत्त्वाचा आहे.
या वादात माजी ऑफस्पिनर आर. अश्विननेही गंभीरची जोरदार बाजू घेतली आहे. अश्विन म्हणतो, “ड्रेसिंग रूममध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, त्यात कोचचा सहभाग असतो. परंतु या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी खेळाडूंवर असते. कोच कधीच मैदानात उतरू शकत नाही किंवा बॅट हातात घेऊन खेळू शकत नाही. त्याचं काम म्हणजे खेळाडूंना तयार करणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं.”
अश्विनच्या मते, गंभीरला हटवण्याची मागणी ही घाईगडबडीची प्रतिक्रिया आहे. “खेळाडूंच्या कमकुवत कामगिरीकडे लक्ष देण्याऐवजी फक्त कोचला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे,” असेही त्याने नमूद केले.
या सर्व चर्चेत गावस्कर आणि अश्विन यांचे एकच मत स्पष्ट होते — टीम हरली म्हणजे कोच दोषी असा सरळसरळ निष्कर्ष चुकीचा आहे. क्रिकेट हा सामूहिक खेळ असून विजय-पराभव दोन्हींसाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचा मिळून सहभाग असतो. गंभीर यांच्या कार्यकाळात टीमने मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत आणि एका-दीड मालिकेतील पराभवानंतर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही, असा सूर अनेक क्रिकेट तज्ज्ञांमध्येही आहे.
आता पुढील मालिकांमध्ये टीम इंडिया पुनरागमन करते का आणि गंभीर यांच्यावरच्या टीका निवळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information