सुहाना खान अलिबाग जमीन खरेदी प्रकरणात अडचणीत? शेतजमिनीचा वाद उफाळला

0
सुहाना खान अलिबाग जमीन खरेदी प्रकरणात अडचणीत? शेतजमिनीचा वाद उफाळला

सुहाना खान अलिबाग जमीन खरेदी प्रकरणात अडचणीत? शेतजमिनीचा वाद उफाळला

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने अलिबागच्या थळ गावात सुमारे 12.91 कोटींना जमीन खरेदी केली. मात्र परवानगीशिवाय शेतकऱ्यांना देण्यात आलेली जमीन खरेदी केल्याचा आरोप होत असून प्रकरणामुळे सुहाना खान अडचणीत सापडली आहे.

सायली मेमाणे

पुणे २ सप्टेंबर २०२५ : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही अलीकडेच तिच्या अभिनय कारकिर्दीमुळे आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत होती. पण यावेळी ती एका गंभीर वादामुळे चर्चेत आली आहे. सुहानाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ गावात मोठी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली. या जमिनीची किंमत सुमारे 12.91 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या जमिनीच्या खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कारण असे म्हटले जात आहे की ही जमीन मूळतः शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारने वाटप केलेली आहे. अशा जमिनीची थेट खरेदी-विक्री परवानगीशिवाय करता येत नाही. सुहाना खानने ही जमीन परवानगीशिवाय खरेदी केली असल्याचे आरोप समोर आले असून त्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्यातील जमीन खरेदीसंबंधी कायद्यांनुसार शेतकऱ्यांना दिलेली जमीन केवळ शेतीपुरतीच वापरता येते आणि ती इतर उद्देशाने विक्री किंवा खरेदी करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी आवश्यक असते. या प्रकरणात सुहानाने ती परवानगी न घेता व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी आणि काही शेतकरी संघटनांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या जमीन व्यवहारामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येते आणि प्रभावशाली लोकांचा फायदा होतो. त्यामुळे त्यांनी या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सुहाना खानच्या अलिबागमधील या जमिनीबद्दल आधीपासूनच रस होता कारण याच भागात शाहरुख खान यांचे आलिशान फार्महाऊस आहे. त्यामुळेच सुहाना खानच्या या खरेदीकडे अधिक लक्ष लागले होते. पण आता कायदेशीर अडथळ्यांमुळे ती खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जर सरकारने या व्यवहारात नियमभंग झाल्याचे मान्य केले तर जमीन व्यवहार रद्द होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच दंडात्मक कारवाईची शक्यताही आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण सुहाना खानवर टीका करत आहेत की सेलिब्रिटी असल्यामुळे तिने विशेष वागणूक मिळवली. काहींचे मत मात्र वेगळे आहे. त्यांना वाटते की सुहाना खानच्या नावावर जमीन खरेदी झाली असेल पण सर्व कायदेशीर प्रक्रिया एजंट किंवा इतर माध्यमातून हाताळल्या गेल्या असतील. अशा वेळी जबाबदारी एजंट्सचीही ठरते. तरीसुद्धा सेलिब्रिटी व्यक्तीमत्व असल्यामुळे सर्वात जास्त टीका सुहाना खानवर होत आहे.

येत्या काळात या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तर सुहाना खानला कायदेशीर लढाई द्यावी लागू शकते. अलिबाग हे मुंबईजवळील श्रीमंत आणि सेलिब्रिटींचे आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या प्रत्येक जमीन व्यवहारावर स्थानिक प्रशासन आणि जनतेचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे सुहाना खानच्या खरेदीला वादाचा रंग चढला असून हा प्रश्न केवळ तिच्यापुरता मर्यादित न राहता मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *