स्मृती इराणी बनल्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री

0
स्मृती इराणी बनल्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री

स्मृती इराणी बनल्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी 2’ मध्ये तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी यांचे मानधन प्रति एपिसोड तब्बल 14 लाख रुपये असून त्या सर्वाधिक महागड्या टीव्ही अभिनेत्री ठरल्या आहेत.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : स्मृती इराणी, ज्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाल्या, त्या पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात दमदार पुनरागमन करत आहेत. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी 2’ या सिक्वेलमध्ये त्यांनी पुन्हा एकदा तुलसी विराणी हीच भूमिका साकारली असून त्यांच्या मानधनामुळे त्या चर्चेत आहेत. स्मृती इराणी आता एका एपिसोडसाठी तब्बल 14 लाख रुपये मानधन घेत आहेत, त्यामुळे त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री ठरल्या आहेत.

ही मालिका 29 जुलैपासून स्टार प्लस आणि जिओ सिनेमावर सुरू झाली आहे. निर्मात्यांच्या माहितीनुसार, या मालिकेचे एकूण 150 एपिसोड्स असणार आहेत. जर स्मृती इराणी एका भागासाठी 14 लाख रुपये घेत असतील, तर त्या या मालिकेसाठी एकूण 21 कोटी रुपये कमावणार आहेत. हा आकडा टीव्ही इंडस्ट्रीसाठी अभूतपूर्व असून, अभिनय क्षेत्रात त्यांचा वर्चस्व पुन्हा स्पष्टपणे दिसत आहे.

एकेकाळी स्मृती इराणींना ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या पहिल्या सत्रात फक्त 1,800 रुपये मानधन मिळायचे. मालिकेच्या वाढत्या लोकप्रियतेनुसार, त्यांच्या मानधनातही वाढ होत गेली. हे मानधन हळूहळू 8,000, 35,000 आणि नंतर 50,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता, एका दशकानंतर त्यांच्या पुनरागमनात झालेली मानधनातील उडी निश्चितच उल्लेखनीय आहे.

इतर टीव्ही कलाकारांच्या तुलनेतही स्मृती इराणी यांचं मानधन लक्षणीय आहे. उदाहरणार्थ, ‘अनुपमा’ मालिकेतील रुपाली गांगुली प्रति एपिसोड 3 लाख रुपये घेतात, तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दिलीप जोशी (जेठालाल) यांचं मानधन सुमारे 1.5 लाख रुपये आहे. जेनिफर विंगेट, तेजस्वी प्रकाश, श्रद्धा आर्या, हिना खान, हर्षद चोपडा यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांचे मानधन 1.5 ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे.

स्मृती इराणी यांचे राजकारणातील यश आणि त्याचबरोबर अभिनय क्षेत्रात परतलेलं योगदान हे दोन्ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं द्योतक आहे. अनेक वर्षांनंतर त्यांनी पुन्हा अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि तोही एका अशा मालिकेसाठी, ज्यामुळे त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचं पुनरागमन केवळ भावनिक नाही, तर आर्थिकदृष्ट्याही एक विक्रम ठरलं आहे.

त्यामुळे स्मृती इराणींच्या या भव्य पुनरागमनाबाबत सोशल मीडियावर आणि टीव्ही इंडस्ट्रीत चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या अभिनयाचं कौतुक तर होतंच आहे, परंतु त्यांचं मानधन ऐकून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. आता या मालिकेचा पुढील प्रवास आणि त्यांच्या कामगिरीची दिशा काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *