हडपसरमध्ये दहशत माजवणारे 6 आरोपी ताब्यात, पोलिसांची धडक कारवाई
हडपसरमध्ये दहशत माजवणारे 6 आरोपी ताब्यात, पोलिसांची धडक कारवाई
हडपसरमध्ये तलवारी, कोयते, रॉड घेऊन दहशत निर्माण करणारे 6 आरोपी ताब्यात. पोलिसांनी अहिल्यानगरमधून अटक करून साडेसतरानळी परिसरातून धिंड काढली.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑगस्ट २०२५ : पुण्यातील हडपसर परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास साडेसतरानळी चौकात दोन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते, तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन उच्छाद मांडला होता. अचानक हल्ल्यासारख्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून या टोळक्याचा शोध सुरू केला. फरार आरोपींचा ठावठिकाणा लागल्यानंतर त्यांना अहिल्यानगर परिसरातून अटक करण्यात आली. गुन्हेगारांच्या दहशतीचा अंत करण्यासाठी आणि नागरिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष पद्धतीने कारवाई केली. आरोपींची साडेसतरानळी परिसरातून धिंड काढण्यात आली, ज्यामुळे परिसरातील लोकांनीही दिलासा व्यक्त केला.
हडपसर पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त करण्यात आली असून, आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे टोळक्यांच्या दहशतीविरुद्ध पोलिसांचे कठोर पाऊल स्पष्ट झाले आहे.