अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा, 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश

0
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा, 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा, 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे 32 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या असून शेतकऱ्यांना मदत लवकर पोहोचणार आहे.

सायली मेमाणे

पुणे १ ऑक्टोबर २०२५ : मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना यंदाच्या अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे तब्बल 32 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब यावर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने ही हानी अत्यंत गंभीर मानली जात आहे. आतापर्यंत पंचनाम्याचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र सलग पडलेल्या पावसामुळे पंचनाम्याच्या कामात अडथळे निर्माण झाले होते आणि अनेक ठिकाणी शेतात जाणे शक्य झाले नव्हते. आता पाऊस ओसरल्याने विभागीय आयुक्तांनी पंचनाम्याच्या कामाला पुन्हा गती देण्याचे आदेश दिले आहेत. 5 ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना यंत्रणेला दिल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत पोहोचवली जाणार आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच मदत पॅकेज जाहीर केले असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत पोहोचावी यासाठी पंचनामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पंचनामे न झाल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाला हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले गेले आहेत. यासाठी महसूल अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी कर्मचाऱ्यांची टीम गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद करत आहे.

पावसामुळे केवळ पिकांचेच नाही तर घरांचे, शेतातील पायाभूत सुविधांचे, जनावरांचे आणि रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांत चिखलामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांची खरीप हंगामातील गुंतवणूक पूर्णपणे पाण्यात गेल्याने कर्जाचा बोजा वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणे अत्यावश्यक आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली असून, पंचनाम्याच्या आधारे त्याचा लाभ मिळणार आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले की, पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांना गावपातळीवर कार्यरत ठेवावे. कुठल्याही कारणास्तव पंचनाम्यांचे काम लांबू नये याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी आपले नुकसान संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कळवावे आणि अधिकाऱ्यांनी ते नोंदवून पंचनाम्यात समाविष्ट करावे, असेही निर्देश दिले गेले आहेत.

दरम्यान, पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या भावना सरकारने ओळखल्या असून, लवकरच त्यांना मदतीचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या बळीराजाला ही मदत थोडाफार दिलासा ठरणार आहे. यासोबतच राज्य सरकारने पिक विमा योजनेचाही लाभ शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *