• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

संत ज्ञानेश्वर पालखी 2025: बैलजोडीचा मान कुठल्या घराण्याला मिळाला

Jun 2, 2025
संत ज्ञानेश्वर पालखी २०२५ राजा आणि प्रधान बैलजोडीला मानसंत ज्ञानेश्वर पालखी २०२५ राजा आणि प्रधान बैलजोडीला मान

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात यंदा बैलजोडीचा कुठल्या घराण्याला मिळाला आहे. कोणत्या बैलजोड्या वापरण्यात येणार, कुठून खरेदी झाल्या, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
रितेश अढाऊ,
प्रतिनिधी, न्यूज डॉटस्.

आळंदी, पुणे: २ जून २०२५ : – यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी गुरुवारी, १९ जून रोजी पंढरपूरकडे आळंदी येथून निघणार आहे. हा पालखी उत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक घटक मानला जातो. यंदा माऊलींच्या पालखी रथाला घुंडरे घराण्याची बैलजोडी ओढण्याचा सन्मान मिळाला आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे यांना या वर्षी या मानाच्या बैलजोडीचे मानकरी म्हणून निवडले गेले आहे.

आज, दिनांक २ जून रोजी माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या मानाच्या बैलजोडीचे औपचारिक पूजन करण्यात आले. पूजनानंतर आळंदी नगरीत ढोल-ताशांच्या सूरात या बैलजोडीची मोठी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी आळंडी परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण अनुभवले गेले.

विवेक घुंडरे यांनी पालखीसाठी सातारा जिल्ह्यातील बावधन गावातून “राजा” आणि “प्रधान” ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून ६ लाख रुपयांना खरेदी केली आहे. दुसरी बैलजोडी “सावकार” आणि “संग्राम” ही हिंजवडी येथील उमेश साखरे यांच्याकडून ५ लाख रुपयांना घेतली आहे. तसेच, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी पुण्यातील नांदेड सिटी येथून निखिल कोरडे यांच्याकडून “मल्हार” व “आमदार” ही बैलजोडी ५ लाख ५१ हजार रुपयांना विकत घेतली आहे. दुसरी जोडी “माऊली” व “शंभू” ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली आहे.

या सर्व बैलजोड्यांना पालखी रथ ओढण्यासाठी आधी शेतीची मशागत व बैलगाडी ओढण्याचा नियमित सराव करून घेतला जात आहे. त्यांच्या खुराकात शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबऱ्याचा भुगा आणि विशेष बैलखाद्य यांचा समावेश आहे.

पालखी सोहळ्याचा प्रस्थान दिवस
संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी गुरुवार, दिनांक १९ जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने यावर्षीच्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्याद्वारे पालखी सुमारे २५६ किलोमीटरचा पायी प्रवास करीत आषाढ शुद्ध दशमी, शनिवार ५ जुलै रोजी पंढरपूरात येईल. त्यानंतर रविवार, ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा महोत्सव पंढरपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे.