Pune Bhide Bridge Traffic Update: दिवाळीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरू
Pune Bhide Bridge Traffic Update: दिवाळीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरू
पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक दिवाळीच्या सणानिमित्त सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहणार, रात्री 10 नंतर वाहतुकीला बंदी. पुणे वाहतूक पोलिसांनी विश्रामबाग आणि डेक्कन विभागांना अंमलबजावणीचे आदेश दिले.
सायली मेमाणे
पुणे ९ ऑक्टोबर २०२५ : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील भिडे पुलावरील वाहतूक दिवाळीच्या सणानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली जाणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नागरिकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पुलावरून वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, रात्री 10 वाजल्यानंतर पुलावरील वाहतुकीला मनाई राहणार आहे.
भिडे पुलावरील वाहतूक यापूर्वी महामेट्रोच्या वतीने डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी केबल ब्रिज तयार करण्याच्या कामामुळे बंद करण्यात आली होती. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील विश्रामबाग आणि डेक्कन परिसरात नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरातील पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, अमोल झेंडे यांनी मोटार वाहन कायद्यानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. वाहन चालकांनी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच पुलाचा वापर करावा, असे स्पष्ट केले गेले आहे. रात्रीच्या वेळेस काम आणि सुरक्षितता यासाठी पुलावरून वाहतूक बंद राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागांना पुलावरील वाहतुकीचे वेळापत्रक तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. दिवसभर वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, तसेच दिवाळीच्या सणाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
भिडे पुलावरून वाहतुकीस मनाई असलेल्या रात्रीच्या वेळेत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पोलिसांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे, अशी सूचना दिली आहे. वाहतूक सुरक्षेसाठी आणि शहरातील गर्दी व्यवस्थापनासाठी हे वेळापत्रक पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.