BMC Housing Lottery 2025: मुंबईत 426 घरांसाठी अर्ज व सोडतीची संपूर्ण माहिती
BMC Housing Lottery 2025: मुंबईत 426 घरांसाठी अर्ज व सोडतीची संपूर्ण माहिती
मुंबई महापालिका (BMC) कडून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी 426 घरांची लॉटरी जाहीर. अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीखा आणि सोडतीबाबत संपूर्ण माहिती येथे मिळवा.
सायली मेमाणे
पुणे १५ ऑक्टोबर २०२५ : मुंबईतील सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठे पाऊल उचलले आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अंतर्गत BMC कडून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 426 घरांसाठी सोडत प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
BMC आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने राबविली जाणारी ही लॉटरी मुंबईतील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल. अर्जदार या सदनिकांसाठी https://bmchomes.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज प्रक्रिया ऑनलाइन 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल.
- अर्जदारांना अर्ज भरता येण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
- अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत स्वीकारली जाईल.
- पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर केली जाईल.
- सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल.
- निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील.
BMC घरांसंदर्भातील माहिती पुस्तिका देखील 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल. या माहिती पुस्तिकेत अर्ज प्रक्रिया, अटी व शर्ती तसेच सदनिकांविषयी सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे. माहिती पुस्तिकेत बदल करण्याचा अधिकार फक्त BMC आयुक्तांकडे आहे.
अर्जदारांसाठी हेल्पलाईनही उपलब्ध आहे. कोणत्याही मदतीसाठी अर्जदार 022-22754553 या नंबरवर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात. तसेच, सहाय्यक आयुक्त मालमत्ता कार्यालयात चौथ्या मजल्यावर, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400 001 येथे देखील भेट देऊन मदत मिळवता येईल.
या लॉटरीमुळे मुंबईतील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळेल आणि शहरातील घरकुलासाठीच्या स्वप्नांना धक्का मिळणार नाही. पारदर्शक पद्धतीने राबवली जाणारी ही सोडत प्रक्रिया नागरिकांसाठी मोठी संधी ठरेल.