साताऱ्याच्या वडूजमध्ये बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट प्रकरण; डॉक्टरांच्या नाव-सहीचा गैरवापर उघडकीस
साताऱ्याच्या वडूजमध्ये बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट प्रकरण; डॉक्टरांच्या नाव-सहीचा गैरवापर उघडकीस
सातारा जिल्ह्यातील वडूज येथे एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत नसतानाही डॉक्टरांच्या नावाचा व सहीचा वापर करून पाच बनावट लॅब रिपोर्ट तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : सातारा जिल्ह्यातील वडूज (ता. खटाव) येथे बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून डॉक्टरांच्या नावाचा आणि सहीचा दुरुपयोग झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. संबंधित डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नसतानाही त्यांच्या नावाचे शिक्के आणि खोट्या सहीचा वापर करून पाच रुग्णांचे बनावट चाचणी अहवाल तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासन, लॅबोरेटरी चालक आणि तंत्रज्ञाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही तक्रार कराड येथील डॉ. संदीप मोहनराव यादव (वय ५२, रा. बनपुरीकर कॉलनी, कराड) यांनी केली आहे. डॉ. यादव यांची २००६ पासून कराड येथे स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना एका विमा कंपनीच्या डॉ. मोना लंबोदर यांचा फोन आला. त्यांनी वडूज येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या पाच रुग्णांचे लॅबोरेटरी रिपोर्ट ईमेलवर पाठवले आणि विचारले की, हे चाचणी अहवाल तुम्ही प्रमाणित केले आहेत का? रिपोर्ट तपासल्यानंतर डॉ. यादव यांनी पाहिले असता, त्या सर्व रिपोर्टवर त्यांचे नाव, शिक्का आणि खोटी सही असल्याचे समोर आले. या रिपोर्टवर रुग्णालयाचा शिक्का आणि अधिकृत सहीही लावण्यात आली होती, ज्यामुळे हे रिपोर्ट खरे असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता.
या प्रकरणात सौरभ कोकरे, हेमंत देवकर, महेश यादव, केशर वाघमोडे आणि प्रतिक कदम या पाच रुग्णांचे बनावट अहवाल तयार करण्यात आले होते. डॉक्टरांच्या नावाने शिक्का बनवून, बनावट सही करून आणि खोट्या अहवालांना वैधतेचा शिक्का देऊन ते रुग्ण आणि विमा कंपन्यांकडे सादर करण्यात आले होते. या सर्व गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर डॉ. यादव यांनी स्पष्ट केले की, ते वडूज येथील त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाहीत आणि संबंधित अहवाल त्यांनी प्रमाणित केलेले नाहीत.
या धक्कादायक घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून वडूज पोलिसांनी तपासाची जबाबदारी घेतली आहे. प्राथमिक तपासात लॅबोरेटरी चालकाने डॉक्टरांचे नाव, नोंदणी क्रमांक आणि सहीचा वापर करून बनावट रिपोर्ट तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे केवळ डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रतिष्ठेवर आघात झाला नाही, तर रुग्णांच्या आरोग्याशीही खेळ झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वैद्यकीय अहवालांमध्ये अशा प्रकारे बनावटगिरी केल्याने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असे मत स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, लवकरच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.