Death Due To Pothole : नगर–मनमाड महामार्गावर खड्ड्यांचा बळी! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नागरिक आक्रोशित
नगर–मनमाड महामार्गावर खड्ड्यांचा बळी! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नागरिक आक्रोशित
नगर–मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; पावसात रस्ता ओळखता न आल्याने भीषण अपघात. नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप, खड्ड्यांवर उपाययोजना मागणी.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑक्टोबर २०२५ : अहमदनगर–मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांनी आणखी एक बळी घेतला आहे. पावसाने आधीच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्ता ओळखणे अवघड झाले आहे. सोमवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात कोपरगावच्या इंदिरापथ भागातील आदित्य देवकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य देवकर हा दुचाकीवरून येवला नाका परिसरातून जात असताना खोल खड्ड्यात अडकून तोल गेला आणि तो अज्ञात वाहनाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले होते तसेच रस्त्यावरील दिवे बंद होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “खड्ड्यांनी आणखी किती जीव घ्यायचे?” दरवर्षी या मार्गावर जीवघेणे अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यभरात सध्या पावसामुळे महामार्ग आणि शहरातील रस्ते खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहनचालकांचे जीव धोक्यात येत आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासनाकडून केवळ तात्पुरते डांबर ओतण्याचे उपाय केले जातात, अशी टीका नागरिक करत आहेत.
वाहतूक कोंडी, अपघात आणि मृत्यूच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून, राज्य सरकारने तत्काळ उपाययोजना करून खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.