पिंपरी चिंचवड महापालिकेची हरित ऊर्जेकडे वाटचाल; सौर ऊर्जेमुळे ५ कोटी ९१ लाखांची बचत

0
पिंपरी चिंचवड महापालिकेची हरित ऊर्जेकडे वाटचाल; सौर ऊर्जेमुळे ५ कोटी ९१ लाखांची बचत

पिंपरी चिंचवड महापालिकेची हरित ऊर्जेकडे वाटचाल; सौर ऊर्जेमुळे ५ कोटी ९१ लाखांची बचत

पिंपरी चिंचवड महापालिकेने सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. ८६ ठिकाणी बसवलेल्या सोलर पॅनेल्समुळे ५ कोटी ९१ लाख रुपयांची वीजबिलात बचत झाली असून ५९ लाख युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे.

सायली मेमाणे

पुणे १ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड: हरित ऊर्जेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पिंपरी चिंचवड महापालिकेने सौर ऊर्जेच्या वापरातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू केला आहे. पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत, महापालिकेने स्वतःच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा बसवली आहे. या उपक्रमातून महापालिकेला तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची वीजबिलात बचत झाली असून, पर्यावरणपूरक शहराच्या दिशेने ही मोठी झेप मानली जात आहे.

महापालिकेने सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकूण ३ मेगावॅट प्रतितास क्षमतेची वीज निर्मिती सुरू केली आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीपासून शाळा, रुग्णालये, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल अशा विविध ८६ ठिकाणी सोलर रुफटॉप पॅनेल्स बसवले आहेत. सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज निर्मिती झाली आहे. या माध्यमातून केवळ आर्थिक बचतच नव्हे, तर स्वच्छ ऊर्जा वापराला चालना मिळत आहे.

महापालिकेच्या ‘ग्रीन एनर्जी’ योजनेअंतर्गत आणखी १३ ठिकाणी ४५० किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेचे काम सुरू असून, ते वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. तसेच ५८ ठिकाणी ४ मेगावॅट क्षमतेची सौर प्रणाली उभारण्याचे नियोजन केले गेले आहे. या प्रकल्पांमुळे पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी होऊन शहराचा ऊर्जेचा वापर अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, “पिंपरी चिंचवड महापालिकेची वीज गरज आता वेस्ट टू एनर्जी आणि सोलर एनर्जी यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांद्वारे पूर्ण केली जात आहे. भविष्यातील उद्दिष्ट म्हणजे हे शहर ‘नेट झिरो सिटी’ बनवणे आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमातून केवळ आर्थिक बचत होत नाही, तर पर्यावरणीय जबाबदारीही पार पाडली जाते.

महापालिकेचे सहशहर अभियंता अनिल भालसाकले यांनी म्हटले की, “हरित ऊर्जेकडे वाटचाल ही केवळ विजेची बचत नसून, ती शहराच्या शाश्वत विकासासाठी एक गुंतवणूक आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे महापालिकेच्या वीज खर्चात लक्षणीय घट झाली असून, भविष्यातही असे अनेक उपक्रम राबवले जातील.”

महापालिकेच्या या प्रकल्पाची काही ठळक वैशिष्ट्येही लक्षवेधी आहेत — प्रकल्पाची क्षमता ३ मेगावॅट प्रतितास, तयार झालेली वीज ५९ लाख १७ हजार युनिट्स, वीजबिलात बचत ५ कोटी ९१ लाख रुपये आणि भविष्यातील नियोजित प्रकल्प क्षमता ४ मेगावॅट इतकी आहे.

शहरातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता, महापालिकेचा सौर ऊर्जा उपक्रम ही वेळेची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहराने हरित ऊर्जेच्या दिशेने ठोस पाऊल उचलत, ‘ग्रीन सिटी’ होण्यासाठीचा पाया मजबूत केला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed