Vote Chori: ब्राझीलच्या मॉडेलने भारतात 22 वेळा मतदान केल्याचा राहुल गांधींचा धक्कादायक दावा; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Vote Chori: ब्राझीलच्या मॉडेलने भारतात 22 वेळा मतदान केल्याचा राहुल गांधींचा धक्कादायक दावा; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हरियाणा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ब्राझीलच्या एका मॉडेलने २२ वेळा मतदान केल्याचा दावा करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसच्या पराभवामागे मोठा कट असल्याचाही आरोप त्यांनी केला.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. दिल्लीत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा दावा केला. एवढेच नव्हे तर एका ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक खुलासा करत निवडणूक आयोगावर थेट टीका केली.
राहुल गांधी यांनी सांगितले की, “देशात मतदार याद्यांमधील फेरफार केवळ वैयक्तिक मतदारसंघांपुरते मर्यादित नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होत आहेत.” त्यांच्या म्हणण्यानुसार, हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय सर्व सर्वेक्षणांमध्ये स्पष्ट दिसत होता. मात्र निकालाच्या वेळी पक्षाचा केवळ २२,७७९ मतांनी पराभव झाला. त्यांनी दावा केला की या राज्यात तब्बल २५ लाख, म्हणजेच १२.५ टक्के मते चोरीला गेली.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवला आणि दावा केला की, “या महिलेच्या फोटोच्या आधारे विविध नावांखाली हरियाणात २२ वेळा मतदान झालं आहे. तिचं नाव कधी सीमा, तर कधी स्वीटी असं बदलण्यात आलं. हीच महिला १० वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जाऊन २२ वेळा मतदान केल्याचं आढळलं आहे.” त्यांनी म्हटलं की, “या प्रकाराने निवडणूक आयोगाची मतदार याद्या किती त्रुटीपूर्ण आणि संशयास्पद आहेत, हे स्पष्ट होतं.”
राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार केवळ एका मतदारापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यभरात संगनमताने केलेला कट आहे. त्यांनी दावा केला की, “हरियाणात ५,२१,६१९ बोगस मतदार, ९३,१७४ खोटे पत्ते आणि १९,२६,३५१ एकत्रित बोगस मतदार आहेत. फॉर्म ६ आणि ७ चा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे.” या सर्व प्रकरणामुळे काँग्रेसच्या विजयाचे पराभवात रूपांतर झाल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, “हे हवेतील आरोप नाहीत. आमच्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. आम्ही हरियाणाच्या मतदार याद्यांवर सखोल चौकशी केली असून, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही अशाच प्रकारचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून एक केंद्रीकृत कट आहे, जो लोकशाही प्रक्रियेला कमजोर करण्यासाठी रचला गेला आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “हरियाणात पोस्टल मतदारांची संख्या आणि प्रत्यक्ष मतदान यांमध्ये प्रथमच एवढा मोठा फरक दिसून आला. एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसचा स्पष्ट विजय दाखवत होते, पण निकाल पूर्णपणे उलट लागले. त्यामुळे या निवडणुकीत मतांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे, हे स्पष्ट आहे.”
राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून, आयोगाने या दाव्यांवर तातडीने प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपकडून या आरोपांचा जोरदार विरोध करण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींवर खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप करत लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण केल्याचा आरोप केला आहे. या वादामुळे देशभरात “मत चोरी” आणि “निवडणूक पारदर्शकता” या विषयांवर तीव्र चर्चा रंगली आहे.