महापालिकेची क्लायंबिंग वॉल धूळखात; लाखो खर्चून उभारलेली सुविधा झाडाझुडपांत, खेळाडूंची नाराजी

0
महापालिकेची क्लायंबिंग वॉल धूळखात; लाखो खर्चून उभारलेली सुविधा झाडाझुडपांत, खेळाडूंची नाराजी

महापालिकेची क्लायंबिंग वॉल धूळखात; लाखो खर्चून उभारलेली सुविधा झाडाझुडपांत, खेळाडूंची नाराजी

अण्णासाहेब मगर क्रीडांगणाजवळ लाखो रुपये खर्चून उभारलेली क्लायंबिंग वॉल दुर्लक्षामुळे वापराविना पडून. नव्या भिंतीवर कोट्यवधी खर्च, पण जुन्या वॉलची देखभाल शून्य; खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

सायली मेमाणे

६ ऑक्टोबर २०२५ : पुण्यातील अण्णासाहेब मगर क्रीडांगणाजवळ महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेली क्लायंबिंग वॉल आज दुर्लक्षामुळे पूर्णपणे धूळखात पडली आहे. शहरात साहसी क्रीडा संस्कृती वाढावी, नवोदित गिर्यारोहकांना प्रशिक्षण मिळावे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व्हावे या उद्देशाने तब्बल १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही सुविधा आज झाडाझुडपांच्या विळख्यात सापडली आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने या वॉलकडे पाठ फिरवल्याने उदयोन्मुख खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पिंपळे सौदागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्लायंबिंग वॉल उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्या वॉलवर २२ देशांतील खेळाडू सहभागी होणार्‍या स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. मात्र, त्याच वेळी नेहरूनगर परिसरातील जुनी क्लायंबिंग वॉल मात्र पूर्णपणे अडगळीत टाकली गेल्याचे चित्र आहे. ही वॉल उभारण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केले होते. अनेक वर्षे येथे प्रशिक्षण वर्ग, गिर्यारोहण शिबिरे आणि स्पर्धांचे आयोजन होत होते. याच वॉलमुळे शहरात गिर्यारोहण संस्कृती रुजण्यास मोठी मदत मिळाली. परंतु, हळूहळू या सुविधेची देखभाल थांबली आणि वॉल बंद करण्यात आली.

सध्या वॉलच्या आजूबाजूला राडारोडा पडलेला आहे तर संपूर्ण संरचना झाडा-झुडपांनी वेढली गेली आहे. वॉलवरील ‘होल्ड्स’ निघून पडले असून सुरक्षा उपकरणांचा पूर्ण अभाव आहे. ज्यांना साहसी क्रीडेत रस आहे अशा अनेक तरुणांनी सांगितले की, वॉल दुरुस्त करून पुन्हा सुरू केली असती तर सामान्य कुटुंबातील मुलांनाही परवडणाऱ्या दरात गिर्यारोहणाचे प्रशिक्षण मिळाले असते. नवीन आणि कोट्यवधींच्या वॉलच्या तुलनेत, ही वॉल अधिक सुलभ आणि सोयीस्कर होती.

याउलट महापालिकेने योगा पार्क, पिंपळे सौदागर येथे पाच कोटी रुपयांचा खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाची नवीन क्लायंबिंग वॉल उभारली. ही भिंत उत्कृष्ट दर्जाची असली तरी जुन्या वॉलच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक गिर्यारोहकांनी केला आहे. “नवी वॉल उत्तम आहे, पण जुन्या वॉलला पूर्णतः बंद करण्याची गरज नव्हती. डागडुजी करून ती वापरता आली असती. सामान्य नागरिकांना कमी दरात प्रशिक्षण देण्यासाठी ही सर्वोत्तम जागा होती,” असे एका गिर्यारोहकाने सांगितले.

क्रीडा विभागाने “जुनी वॉल वापरायोग्य राहिली नाही” असा दावा केला असला, तरी दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्याबाबत ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. या निर्णयावर क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरात ‘मिशन ऑलिम्पिक’च्या माध्यमातून क्रीडा संस्कृती वाढवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुले उभारण्याचा दावा महापालिका करत आहे. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली सुविधा वापराशिवाय बंद पडल्याने ‘मिशन ऑलिम्पिक’च्या हेतूवरच प्रश्न निर्माण होत आहेत.

उदयोन्मुख गिर्यारोहकांच्या मते, शहरात गिर्यारोहणासारख्या साहसी क्रीडा प्रकारांसाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. पिंपळे सौदागरची वॉल उत्कृष्ट असली तरी ती सर्वांसाठी सहज उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर नेहरूनगरची वॉल दुरुस्त करून पुन्हा सुरू केल्यास शहरातील क्रीडा संस्कृती वाढेल आणि अनेक मुलांना प्रशिक्षणाची संधी मिळेल. महापालिकेने या सुविधेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले की, “क्लायंबिंग वॉल वापरायोग्य राहिली नसल्याने दुर्लक्ष झाले. सध्या खेळाडू नवीन वॉल वापरत आहेत.” मात्र दुरुस्तीचा पर्याय अजूनही अनुत्तरित असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed