सारसबाग बंदीवर मुस्लिम सत्यशोधक मंडळाची प्रतिक्रिया : नागरी हक्कांचा भंग?

0
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग बंद

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग बंद

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग बंद ठेवण्याच्या निर्णयावर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने विरोध दर्शवला. मंडळाने हा निर्णय नागरी अधिकारांचा अपमान असल्याचे म्हटले.

सायली मेमाणे

पुणे १० जून २०२५ : ‘कोणतीही शहानिशा न करता महापालिका अधिकाऱ्यांनी बासी ईदला सारसबाग बंद ठेवली. पण, असे करताना आपण एका विशिष्ट समुदायाचे नागरी अधिकार नाकारतो आहे, त्यांचा अपमान करतो आहे आणि एका अर्थाने अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला पुन्हा जन्माला घालतो आहे, हे ध्यानीमनी येत नाही याचे आश्चर्य वाटते,’ अशा शब्दांत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने सोमवारी टीका केली.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे भूमिका मांडली. ‘मुस्लिम समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या रमजान ईद आणि बकरी ईद सणाच्या काळात महिलावर्गाला स्वच्छता, स्वयंपाक करताना खूप परिश्रम पडतात. त्यातून विश्रांती आणि आनंद मिळवण्यासाठी त्या जवळपासचे बगीचे, चित्रपटगृह किंवा करमणुकीच्या ठिकाणी जातात. यापासून त्यांना वंचित करण्यासाठी आणि बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिमांनी बागेत जाऊ नये म्हणून सारसबाग बंद ठेवण्यात आली. त्यास खासदारांचे आक्षेपार्ह पत्र निमित्त ठरले,’ असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘वास्तविक शिस्त मोडणाऱ्यांविरोधात कायदे अस्तित्वात आहेतच. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा निर्माण करता येणे शक्य आहे. मांसाहारामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असेल, तर तेथे मांसाहाराला बंदी घालावी, कोणत्याही समुदायाच्या माणसांना नाही. सर्वसामान्य मुस्लिम समाजाविरोधात संशय, द्वेष, शत्रुभाव निर्माण करणारे असे पत्रक काढणे आणि वर्तन करणे, हे या समाजाचे राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार नाकारणारे आहे,’ असे तांबोळी यांनी या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *