World Cup Win: महाराष्ट्राच्या खेळाडूंचा CM फडणवीसांच्या हस्ते गौरव; प्रत्येकी 2.25 कोटींचे रोख बक्षीस
महाराष्ट्राच्या खेळाडूंचा CM फडणवीसांच्या हस्ते गौरव; प्रत्येकी 2.25 कोटींचे रोख बक्षीस
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार; प्रत्येकी 2.25 कोटींचे बक्षीस जाहीर.
सायली मेमाणे
७ ऑक्टोबर २०२५ : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील विजेत्या खेळाडूंचा भव्य सत्कार केला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदाच महिला विश्वचषक पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या विशेष समारंभात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा—स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव—तसेच मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा गौरव करण्यात आला.
समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करत त्यांना ‘महाराष्ट्राचा अभिमान’ असे संबोधले. मैदानावरील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने राज्याचे नाव उज्ज्वल झाल्याचे ते म्हणाले. यावेळी तीनही खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. याशिवाय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना 22.5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 11 लाख रुपयांचा सन्मान देण्यात आला. राज्य सरकारकडून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला क्रिकेट खेळाडूंना गौरविण्यात आले असल्याने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या महिला संघाने दाखवलेला टीमवर्क, त्यांची सुसूत्रता आणि परस्परांतील समन्वय हा विजयाचा मुख्य आधार होता. जेमिमा रॉड्रिग्सने उपांत्य सामन्यात झळकवलेली शानदार शतकी खेळी संपूर्ण स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने पारंपरिकपणे काही निवडक देशांकडे जाणाऱ्या विश्वचषकाला मोडीत काढत पहिल्यांदाच हा किताब जिंकला, ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ यांनी अखंड मेहनत घेतल्यानेच टीम इंडियाने हे स्वप्न पूर्ण केले.
यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला क्रिकेटच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देशातील तरुण मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी आणि जागतिक पातळीवर चमकण्यासाठी या विजयाचा मोठा सकारात्मक प्रभाव पडेल, असे त्यांनी सांगितले.
स्मृती मानधनाने सन्मानाबद्दल आभार मानत राज्य सरकारच्या पाठिंब्याबद्दल विशेष भावना व्यक्त केली. “2017 मध्ये आम्ही उपविजेतेपद मिळवले असतानाही महाराष्ट्राने आम्हाला सन्मान दिला. आज विश्वचषक विजयानंतर हा सन्मान अधिक खास आहे. आमच्या सपोर्ट स्टाफमधील अनेक सदस्य महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्या कठोर मेहनतीशिवाय हा विजय शक्य नव्हता,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सेमीफायनल आणि फायनल मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाल्यावर टीममध्ये विशेष ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. “या खेळाडूंची कौशल्य पातळी कल्पनेपलीकडे आहे. एकच स्वप्न होते—वर्ल्डकप जिंकणे. त्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत केली,” असे त्यांनी सांगितले.
या भव्य सत्काराने महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला क्रिकेटच्या वाढत्या यशानंतर राज्य सरकारकडून मिळालेल्या सन्मानामुळे भावी पिढीतील मुलींना मोठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा सत्कार केवळ खेळाडूंच्या मेहनतीचा गौरव नसून महिला क्रिकेटच्या भविष्यातील सुदृढ पायाभरणीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.