युपीआय बॅलन्स चेक मर्यादा: १ ऑगस्टपासून नवीन नियम

0
युपीआय बॅलन्स चेक मर्यादा या नव्या नियमाचा सर्वसामान्य वापरकर्त्यांवर थेट परिणाम

युपीआय बॅलन्स चेक मर्यादा या नव्या नियमाचा सर्वसामान्य वापरकर्त्यांवर थेट परिणाम

युपीआय बॅलन्स चेकसाठी मर्यादा आणि अन्य बंधने १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. यामुळे वापरकर्त्यांना दररोज ठरावीक वेळा बॅलन्स तपासता येणार आहे.

सायली मेमाणे

पुणे १० जून २०२५ : युपीआय बॅलन्स चेक मर्यादा या नव्या नियमाचा सर्वसामान्य वापरकर्त्यांवर थेट परिणाम होणार आहे. युपीआय प्रणालीवर सध्या अतोनात ताण येत असल्याने आणि वेळोवेळी तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या बदलांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२५ पासून होण्याची शक्यता आहे.

NPCI कडून मिळालेल्या माहितीनुसार, युपीआय सेवा सतत खंडित होण्यामागे एक मोठे कारण म्हणजे अत्याधिक API विनंत्या. विशेषतः ‘बॅलन्स तपासणी’सारख्या लहान पण वारंवार होणाऱ्या विनंत्या प्रणालीवर मोठा भार टाकतात. त्यामुळे, नवीन नियमानुसार, वापरकर्त्यांना दिवसात जास्तीत जास्त ५० वेळा बॅलन्स तपासण्याचीच परवानगी दिली जाईल.

याचबरोबर, एका मोबाइल क्रमांकाशी संलग्न असलेल्या खात्यांची माहिती दिवसातून २५ वेळांपेक्षा अधिक पाहता येणार नाही. याचा उद्देश म्हणजे अनावश्यक वापर रोखणे आणि प्रणाली कार्यक्षम ठेवणे.

NPCI कडून आणखी एक बदल म्हणजे ऑटो पेमेंट्सचे वेळापत्रक. म्हणजेच, SIP, OTT सेवांसाठी होणारी मासिक कटौती किंवा इतर ठराविक व्यवहार ‘नॉन-पीक अवर्स’ मध्ये केले जातील. नॉन-पीक अवर्स म्हणजे सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते संध्याकाळी ५ दरम्यान आणि रात्री ९:३० नंतरचा कालावधी.

सध्याच्या घडीला युपीआयवर दरमहा जवळपास १६ अब्ज व्यवहार केले जात आहेत. ह्या प्रचंड संख्येच्या व्यवहारांमध्ये मोठा हिस्सा छोट्या, सततच्या विनंत्यांचा आहे. NPCI च्या निरीक्षणानुसार, या विनंत्यांमध्ये सर्वाधिक बॅलन्स चेक ट्रान्झॅक्शन्स आढळून आल्या आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक बनले आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात काही वेळा युपीआय सेवा तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्या होत्या. एका दिवसात पाच ते सहा तास सेवा बंद होती, जे तीन वर्षांतील सर्वात मोठे अडथळे मानले जातात. याचा परिणाम लाखो वापरकर्त्यांवर झाला. अगदी एका मिनिटासाठी सेवा बंद पडली, तरी अंदाजे चार लाख व्यवहार थांबतात, अशी माहिती NPCI ने दिली आहे.

या नव्या मर्यादांमुळे काही वापरकर्त्यांना सुरुवातीला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यवसायिक वापरकर्ते आणि ऑनलाइन विक्रेते, जे सतत बॅलन्स तपासत असतात. मात्र, NPCI ने स्पष्ट केले आहे की हे उपाय युपीआय प्रणाली दीर्घकाळ कार्यक्षम ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

सध्या या नियमांचा अंतिम मसुदा तयार करण्यात येत असून, लवकरच NPCI यावर अधिकृत अधिसूचना जाहीर करेल. दरम्यान, वापरकर्त्यांनी गरज असल्यासच बॅलन्स तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.

युपीआयने भारतीय डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. रोख रक्कमेशिवाय व्यवहार करण्याचा विश्वास वाढला असून, यामुळे खिशात पैसे बाळगण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळेच, युपीआय सेवा खंडित होणे म्हणजे अनेकांसाठी अडचणीचे ठरते. NPCI च्या या पावलामुळे ही प्रणाली अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि स्थिर राहण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *