IND vs SA Test: ईडन गार्डन्सवर बुमराहचा धडाका! 5 विकेट घेत इतिहास रचला; SENA वर नवा विक्रम

0
ईडन गार्डन्सवर बुमराहचा धडाका! 5 विकेट घेत इतिहास रचला; SENA वर नवा विक्रम

ईडन गार्डन्सवर बुमराहचा धडाका! 5 विकेट घेत इतिहास रचला; SENA वर नवा विक्रम

IND vs SA Test: जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवरील पहिल्याच कसोटीत 5 विकेट घेत दक्षिण अफ्रिकेला 159 धावांवर रोखले. SENA देशांविरुद्ध सर्वाधिक 5 विकेट घेणारा आशियाई गोलंदाज ठरला.

सायली मेमाणे

१४ नोव्हेंबर २०२५ भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेला दमदार सुरुवात झाली असून, पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकन संघाला फक्त 159 धावांत रोखले. या संपूर्ण डावात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते जसप्रीत बुमराहने. ईडन गार्डन्सवर आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात बुमराहने 5 विकेट घेत ऐतिहासिक विक्रम रचला आहे.

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचे फलंदाज टिकू शकले नाहीत. बुमराहने पहिल्याच स्पेलपासून आफ्रिकन फलंदाजांना त्रास दिला. त्याने 14 षटकांत 5 निर्धाव षटकं टाकत 27 धावांत 5 विकेट घेतल्या. त्याच्या शिकार झालेल्यांमध्ये रियान रिकल्टन, एडन मार्करम, टोनी डी जॉर्जी, सायमन हार्मर आणि केशव महाराज यांचा समावेश आहे.

या कामगिरीसह जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीत 16व्यांदा एका डावात 5 विकेट घेण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे ईडन गार्डन्सवर तो पहिल्यांदाच कसोटी सामन्यात उतरला आणि पहिल्याच सामन्यात पाच विकेटसह आपले वर्चस्व दाखवले. ईडनवर ही त्याची पहिली उल्लेखनीय नोंद ठरली आहे.

याहून मोठी ऐतिहासिक बाब म्हणजे बुमराहने SENA देशांविरुद्ध—दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया—या सर्व देशांविरुद्ध एकूण 13व्यांदा 5 विकेट घेतल्या आहेत. आशियाई गोलंदाजांमध्ये हा विक्रम सर्वाधिक आहे. याआधी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम या यादीत अग्रस्थानी होता. अक्रमने SENA संघांविरुद्ध 12 वेळा पाच किंवा अधिक विकेट घेतल्या होत्या. मात्र आता बुमराहने हा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढत नवा नेता बनला आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध बुमराहची ही चौथी 5 विकेटची कामगिरी आहे. या नोंदीसह त्याने भारताच्या माजी दिग्गज गोलंदाज जावगाल श्रीनाथ आणि हरभजन सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. या दोन्ही गोलंदाजांनीही दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 4 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या.

बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना धावा जमवणे अवघड झाले. विकेटवर उडणारी उंच उसळी, अचूक लाइन-लेंथ आणि पायझोडक चेंडू—या सर्वांचा अफ्रिकन फलंदाजांना कोणताच तोड नव्हता. त्याची लय आणि एकाग्रता पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे.

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताने सामना आपल्या ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. बुमराहच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे भारताला मोठा फायदा झाला असून, मालिकेतील विजयाच्या दिशेने भारतीय संघाने मजबूत पाऊल टाकले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *