बारामतीत ‘10,000 रुपये आणि 1BHK घर’चे गाजलेले आश्वासन! काळूराम चौधरी कोण आणि त्यांचा प्रवास कसा?
बारामतीत ‘10,000 रुपये आणि 1BHK घर’चे गाजलेले आश्वासन! काळूराम चौधरी कोण आणि त्यांचा प्रवास कसा?
बारामती नगरपरिषद निवडणुकीत काळूराम चौधरी यांनी प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये आणि 1BHK घर देण्याचे आश्वासन दिल्याने राज्यभर चर्चा. BSP चे महासचिव असलेल्या चौधरींचा राजकीय आणि सामाजिक प्रवास जाणून घ्या.
सायली मेमाणे
१६ नोव्हेंबर २०२५ : बारामती नगरपरिषद निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव काळूराम चौधरी यांनी दिलेल्या भव्य आश्वासनामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “बारामतीकरांनी मला एक संधी दिली, तर मी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देईन आणि मागेल त्याला 1BHK घर देईन,” असे वक्तव्य करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घोषणेनंतर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत दाखल झालेला त्यांचा उमेदवारी अर्ज आता अधिकच गाजत आहे. पण नक्की कोण आहेत काळूराम चौधरी? त्यांचा राजकीय प्रवास काय आहे? आणि बारामतीच्या राजकारणात त्यांची भूमिका का महत्त्वपूर्ण मानली जाते?
काळूराम चौधरी हे BSP चे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहेत आणि बारामतीतील पवार कुटुंबाच्या मजबूत राजकीय परंपरेला त्यांनी अनेक वर्ष सातत्याने आव्हान दिले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवणाऱ्या थोड्याच विरोधकांपैकी ते एक. राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेल्या बारामतीत ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
राजकीय निवडणुकांत त्यांनी पवार कुटुंबाविरुद्ध अनेक वेळा कडा लढती दिल्या आहेत. 2004, 2009 आणि 2014 या निवडणुकांत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देत त्यांनी तब्बल 30,000 पेक्षा अधिक मतं मिळवत आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर बारामतीच्या राजकारणात त्यांचे नाव अधिक ठळकपणे समोर येऊ लागले.
चौधरी यांची ओळख केवळ राजकीय विरोधक अशी नसून ते एक लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. वाहतूक कोंडी, अपघात, रस्त्यांची अवस्था, पथविक्रेत्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी बारामतीत मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात डंपरने झालेल्या अपघातानंतर त्यांनी पोलिस प्रशासनावर दबाव आणत दिवसा अवजड वाहनांवर निर्बंध आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सक्रियतेमुळे जनतेशी त्यांचा थेट संवाद निर्माण झाला असून अनेक नागरिक त्यांना ‘सामान्यांचा आवाज’ मानतात.
त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास तळातून सुरू झाला आहे. शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण केल्यानंतर त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी समाजसेवेत पाऊल ठेवले. अवघ्या 18 व्या वर्षी BSP च्या बारामती विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, ज्यातून त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल पक्षाने घेतल्याचे दिसते. त्यांनी 1999 मधील नगरपालिका पोटनिवडणुकीत सहभागी होत आपल्या राजकीय कारकिर्दीची औपचारिक सुरुवात केली. त्यानंतर पुणे जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेश सचिव अशी अनेक जबाबदारीची पदे त्यांनी भूषवली आहेत. आज ते महाराष्ट्र BSP चे महासचिव आणि स्टार प्रचारक या दोन्ही भूमिकांमध्ये काम पाहतात.
चौधरी सध्या आपल्या राजकीय कामासोबतच वडिलोपार्जित पाच एकर शेतीही कसतात. त्यांची पत्नी अर्चना चौधरी या स्वस्त धान्य दुकान चालवतात आणि स्थानिक स्तरावर समाजाशी जोडलेल्या उपक्रमांत सहभागी होतात. साधेपणा, थेट संवाद आणि सामाजिक सक्रियता हे त्यांचे वेगळेपण मानले जाते.
बारामतीत नगराध्यक्ष पदासाठी दिलेले ‘10,000 रुपये आणि 1BHK घर’चे आश्वासन अत्यंत लक्षवेधी मानले जात आहे. हे आश्वासन व्यवहार्य आहे का? ते कसे साकार करणार? यावर राजकीय विश्लेषक चर्चेत आहेत. मात्र या घोषणेने काळूराम चौधरी पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.