IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशीचे आव्हान! पाकिस्तानी गोलंदाजांवर पुन्हा वर्चस्व गाजवण्याची संधी
IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशीचे आव्हान! पाकिस्तानी गोलंदाजांवर पुन्हा वर्चस्व गाजवण्याची संधी
यूएईविरुद्ध 42 चेंडूत 144 धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे पाकिस्तान A विरुद्धही सर्वांचे लक्ष. ACC Rising Stars 2025 स्पर्धेत दमदार खेळीची अपेक्षा.
सायली मेमाणे
पुणे १७ नोव्हेंबर २०२५ : एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेत आज भारत अ आणि पाकिस्तान अ संघात रंगणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कतारमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा युवा खेळाडूंना स्वतःची प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी देत आहे. भारताच्या अ संघाने यूएईविरुद्ध पहिला सामना जिंकत दमदार सुरुवात केली. या विजयाचा मोठा हिरो ठरला सलामीवीर वैभव सूर्यवंशी. त्याच्या धडाकेबाज खेळीद्वारे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यूएईविरुद्ध सूर्यवंशीने केवळ 42 चेंडूत अभूतपूर्व 144 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि तब्बल 15 षटकारांचा वर्षाव होता. विरोधी गोलंदाजांवर आक्रमण करताना तो अक्षरशः वादळासारखा धावपट्टीवर धडकला. त्याची ही खेळी भारताच्या मोठ्या विजयासाठी निर्णायक ठरली. त्यामुळेच पाकिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून पुन्हा एकदा असाच स्फोटक खेळ पाहण्याची चाहत्यांची अपेक्षा आहे.
सूर्यवंशीचा फॉर्म पाहता पाकिस्तानविरुद्धचा सामना अधिकच रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 पासून त्याची बॅट शांत बसलेली नाही. इंग्लंड दौऱ्यात भारतीय अंडर-19 संघासाठी त्याने कमालीची फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियातही त्याची तडाखेबाज कामगिरी कायम राहिली. त्यानंतर रणजी ट्रॉफी 2025 मध्येही त्याने अनेक मोठ्या डावांनी प्रभाव टाकला. या सलग कामगिरीमुळे तो भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा म्हणून नावारूपाला आला आहे. आता पाकिस्तानविरुद्धचे आव्हान असल्याने सूर्यवंशीची कसोटी अधिक कठीण आहे; परंतु त्याचा फॉर्म पाहता तो धमाकेदार खेळी करण्यास सक्षम आहे.
पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक शैलीत फलंदाजी करणे हे युवा खेळाडूंसाठी मोठे आव्हान असते. वेगवान चेंडू, स्विंग आणि स्पिन तिन्ही बाबतीत पाकिस्तानचे गोलंदाज दमदार असतात. मात्र सूर्यवंशीची ताकद म्हणजे त्याचे स्वच्छ टायमिंग, नैसर्गिक आक्रमकता आणि फटक्यांची विविधता. जर त्याने गणेशीपेक्षा अधिक संयम दाखवत योग्य वेळी मोठे शॉट्स खेळले, तर तो पुन्हा मोठा डाव खेचू शकतो.
भारत अ चा कर्णधार जितेश शर्मानेही यूएईविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने 32 चेंडूत 83 धावा ठोकत संघाचा स्कोर डोंगराएवढा नेला. त्याच्या डावात 8 चौकार आणि 6 षटकार होते. सूर्यवंशीसोबतचा त्याचा तडाखेबाज खेळ पाकिस्तानविरुद्धही निर्णायक ठरू शकतो. जितेश मोठ्या सामन्यांत स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतरणार आहे.
नमन धीरनेही पहिल्या सामन्यात महत्त्वाची छोटी खेळी खेळून संघाला चांगला फायदा करून दिला. तसेच सलामीवीर प्रियांश आर्य याच्याकडूनही चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. या सर्व फलंदाजांचा सामूहिक खेळ पाकिस्तान अ संघाविरुद्ध भारताला जिंकून देऊ शकतो.
एकूणच, भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील हा सामना युवा खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारा ठरणार आहे. वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा शतक झळकावून चर्चेत राहतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याने आजच्या सामन्यात दमदार कामगिरी केली तर मुख्य भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या त्याच्या संधी अधिक घट्ट होऊ शकतात.