Pune Grand Tourमुळे हिन्जवडी IT पार्ककडेही सुधारणा अपेक्षित; कर्मचाऱ्यांची #UnclogHinjawadiITPark मोहिमेने वाढवला दबाव

0
Pune Grand Tourमुळे हिन्जवडी IT पार्ककडेही सुधारणा अपेक्षित; कर्मचाऱ्यांची #UnclogHinjawadiITPark मोहिमेने वाढवला दबाव

Pune Grand Tourमुळे हिन्जवडी IT पार्ककडेही सुधारणा अपेक्षित; कर्मचाऱ्यांची #UnclogHinjawadiITPark मोहिमेने वाढवला दबाव

Pune Grand Tourपूर्वी शहरातील सौंदर्यीकरण वेगाने सुरू असताना हिन्जवडी IT पार्कमधील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा IT कर्मचाऱ्यांचा आरोप. #UnclogHinjawadiITPark मोहिमेला मोठा प्रतिसाद.

सायली मेमाणे

पुणे १७ नोव्हेंबर २०२५ :पुण्यात होणाऱ्या पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, स्पर्धेच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर हिन्जवडी IT पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो IT व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरात इव्हेंट-केंद्री सुधारणा होत असताना हिन्जवडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दीर्घकालीन पायाभूत समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत, असा आरोप कर्मचारी करत आहेत. या सर्वांचा आवाज एकवटत #UnclogHinjawadiITPark या मोहिमेद्वारे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

हिन्जवडीतील कर्मचार्‍यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात “असमान विकास” हा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. Pune Grand Tour च्या मार्गांवर BRT लेन साफसफाई, रंगकाम, पुलांच्या मार्गांची दुरुस्ती, मध्यभागी फुलझाडे व लँडस्केपिंग, नवीन सिग्नेज अशा कामांना अल्पावधीत गती देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ही कामे स्वागतार्ह असली तरी ती केवळ एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्तानेच होत असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तर हिन्जवडी IT पार्कमधील वास्तविक परिस्थिती आजही गंभीरच आहे. सुमारे ३ लाखाहून अधिक कर्मचारी काम करणाऱ्या या आर्थिक झोनमध्ये दररोज तीव्र वाहतूककोंडी, खराब अंतर्गत रस्ते, बांधकामांमुळे होणारे अनियोजित डायव्हर्जन, पादचारी सुविधांचा अभाव, अपुरा सार्वजनिक परिवहन, तसेच PMRDA च्या प्रकल्पांतील विलंब असे अनेक मुद्दे कायम आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून हे प्रश्न वारंवार मांडले गेले तरी ‘लक्षणीय प्रगती’ झालेली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

हिन्जवडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांपैकी एक असून IT क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तरीही या क्षेत्राच्या विकासाकडे ‘तशीच तातडी’ न दाखवल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. “पुणे ग्रँड टूरसाठी ज्या वेगाने रस्ते आणि सुविधा सुधारल्या जात आहेत, तेच वेगाने काम दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी का होऊ नये?”, असा थेट सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

यासोबतच PMC, PCMC, PMRDA आणि वाहतूक पोलीस यांना तातडीने काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. हिन्जवडीतील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेणे, महत्त्वाच्या पायाभूत सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र निधी आणि ठोस वेळापत्रक जाहीर करणे, संबंधित यंत्रणांनी समन्वय वाढवणे आणि हितधारकांशी पारदर्शक संवाद ठेवणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कर्मचारी आग्रही आहेत. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम शहराची ओळख वाढवतात, परंतु मूलभूत सुविधा दुर्लक्षित होणार नाहीत याची खात्री करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

सोशल मीडियावर #UnclogHinjawadiITPark या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत असून, प्रवासी, रहिवासी आणि मोठ्या प्रमाणात IT कर्मचारी या मोहिमेत सहभागी होत आहेत. पुणे ग्रँड टूरची तयारी वेगाने चालू असताना हिन्जवडीतील रोजच्या समस्यांकडेही आता प्रशासनाने तितक्याच गांभीर्याने पाहण्याची वेळ आल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. आगामी काही दिवसांत या बाबत प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलले जाते का, याकडे पुणेकरांचे आणि विशेषत: IT कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed