लोणावळा पर्यटनावर पावसाळी ब्रेक: पर्यटकांसाठी प्रशासनाचे निर्बंध आणि इशारे

1
लोणावळा पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदीची सूचना

लोणावळा पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदीची सूचना

पावसाळ्यात वाढत्या अपघातांमुळे लोणावळा पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू; पर्यटकांसाठी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार.

सायली मेमाणे

पुणे ११ जून २०२५ : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणावळा आणि मावळ परिसरात निसर्गाने जणू हिरवळांची उधळण केली आहे. यामुळे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना, सुरक्षिततेचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने ७ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान लोणावळा परिसरातील विविध पर्यटनस्थळी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार, पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे.

ही कारवाई मुख्यत्वे अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात येत असून, एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड व विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आणि पवना धरण परिसर हे मुख्यतः प्रतिबंधित पर्यटन स्थळांमध्ये आहेत. मात्र, भुशी धरणाचा परिसर या आदेशातून वगळलेला असून, पर्यटक तिथे जाण्याची मुभा आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, धबधब्यांमध्ये उतरणे, प्रवाहात पोहणे, कड्यांवर सेल्फी घेणे, मद्यपान करणे, सार्वजनिक स्थळी गैरवर्तन करणे, कचरा टाकणे, मोठ्या आवाजात म्युझिक वाजवणे, ध्वनी व जलप्रदूषण करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या कृती यावर पूर्णपणे बंदी आहे. यासोबतच, धरण परिसरात खासगी वाहने नेणेही निषिद्ध असून, केवळ अत्यावश्यक सेवांची वाहनेच तिथे प्रवेश करू शकतील.

सर्व पर्यटनस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्बंध लागू केले असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार दंड अथवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. अशा घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने पावसाळ्याच्या पर्यटनावर तात्पुरता ब्रेक लावत, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

1 thought on “लोणावळा पर्यटनावर पावसाळी ब्रेक: पर्यटकांसाठी प्रशासनाचे निर्बंध आणि इशारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed