पुणे विमानतळ रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण लवकरच; वाहतूक कोंडीची समस्या होणार दूर

0
पुणे विमानतळ रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण लवकरच; वाहतूक कोंडीची समस्या होणार दूर

पुणे विमानतळ रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण लवकरच; वाहतूक कोंडीची समस्या होणार दूर


विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता १२ मीटरवरून २४ मीटर रुंद होणार. सीएसआर निधीतून जागतिक दर्जाचे सुशोभीकरण; विमानतळावरील वाढत्या वाहतुकीस दिलासा मिळणार.

पुणे 10 डिसेंबर २०२५ : पुणे विमानतळावरून दररोज वाढत असलेली प्रवासी व वाहनांची वर्दळ लक्षात घेता विमानतळ रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण या दोन्ही कामांना आता गती मिळणार आहे. शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि आकर्षक प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता 12 मीटरवरून 24 मीटर इतका रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) अंतर्गत जागतिक दर्जाच्या मानकांनुसार विकसित केला जाणार असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

लोहगावमधील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज जवळपास 200 ते 225 उड्डाणे होत असून वार्षिक प्रवासीसंख्या कोटीच्या पुढे गेली आहे. यात दिवसेंदिवस वाढ होणे स्वाभाविक आहे. मात्र वाढत्या प्रवासी आणि वाहन ताणामुळे विमानतळ रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः पीक अवर्समध्ये प्रवाशांना मोठ्या विलंबाला सामोरे जावे लागत होते. रस्ता अरुंद असल्याने बस, टॅक्सी, खासगी वाहने आणि विमानतळातील वाहतूक एकत्रितपणे कोंडीचे मोठे कारण ठरत होती. म्हणूनच या रस्त्याचे रुंदीकरण अत्यावश्यक झाले होते.

या विषयावर स्वतः पुढाकार घेत मोहोळ यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विमानतळ संचालक संतोष ढोके आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन कुलदीप सिंग यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणासोबतच सुशोभीकरणाचा निर्णय अंतिम करण्यात आला. हा रस्ता हवाई दलाचा आणि काही अंशी खाजगी मालकीचा असल्याने जागा ताब्यात न मिळाल्यामुळे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र अलीकडील चर्चेमध्ये हवाई दलाने अखेर मंजुरी दिली असून खाजगी जमीन मालकांनीही भूसंपादनाला संमती दर्शवली. त्यामुळे 3 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पास आता पूर्णतः मार्ग मोकळा झाला आहे.

रुंदीकरणाबरोबरच या रस्त्याला सौंदर्यवर्धनाची जोड देण्यात येणार आहे. पादचारी मार्ग, शोभिवंत वृक्षारोपण, कारंजी, आधुनिक प्रकाशयोजना, आकर्षक स्ट्रीट फर्निचर यामुळे हा रस्ता शहराच्या सौंदर्य आणि वारसा दर्शनाचा नवा आयकॉनिक स्पॉट ठरेल. पुण्याच्या कला, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारी शिल्पे आणि भव्य चित्रदालनही यामध्ये समाविष्ट केली जातील. यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना पुण्याची ओळख रस्त्यापासूनच मिळेल, तर जाणाऱ्यांच्या मनात शहराचा समृद्ध वारसा कायमस्वरूपी ठसा उमटेल, अशी कल्पना मांडण्यात आली आहे.

विमानतळाकडे जाणारा हा महामहत्त्वाचा मार्ग आता प्रशस्त झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवासी वाहतूक सुरळीत होईल आणि आपत्कालीन विमानतळ सेवांनाही गती मिळेल. रस्त्याचे जागतिक दर्जाचे रूपांतर हे केवळ पायाभूत सुविधा सुधारण्यापुरते मर्यादित नसून पुण्याच्या शहरी सौंदर्यवर्धनातील एक मोठे पाऊल ठरणार आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *