Thane News: सुट्टीच्या वादातून ठाण्यात ‘गोळीबार’ची धमकी; घरकामगार महिलेच्या कुटुंबाला घरमालकीणीच्या मुलाची बंदुकीची धाक

Thane News: सुट्टीच्या वादातून ठाण्यात ‘गोळीबार’ची धमकी; घरकामगार महिलेच्या कुटुंबाला घरमालकीणीच्या मुलाची बंदुकीची धाक
ठाण्यात घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरात घरकामगार महिलेच्या सुट्टीवरून झालेल्या वादात घरमालकीणीच्या मुलाने बंदुकीसारख्या दिसणाऱ्या लायटरने धाक दाखवला. कासारवडवली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
पुणे 10 डिसेंबर २०२५ : ठाण्यात घरकामगार महिला आणि घरमालकीण यांच्यातील वादाने एका धक्कादायक वळण घेतले असून या वादात घरमालकीणीच्या मुलाने घरकामगार महिलेच्या कुटुंबाला ‘बंदूक’ रोखल्याचा प्रकार उघड झाला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने एक दिवसाची सुट्टी मागून चार दिवस कामावर न आल्याने हा वाद निर्माण झाला. साध्या ‘तू तू मैं मैं’ मधून सुरू झालेला हा प्रसंग इतका बिघडला की पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचला. कासारवडवली पोलिसांनी घरमालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील जानगिड गॅलॅक्सी टॉवरमध्ये राहणाऱ्या मोनिका शर्मा यांच्या घरी संबंधित घरकामगार महिला गेल्या सहा महिन्यांपासून काम करत होती. 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिने एक दिवसाची सुट्टी घेतली होती. मात्र चार दिवस उलटूनही ती कामावर परतली नाही. वारंवार फोन करूनही तिने फोन उचलला नाही, त्यामुळे मोनिका शर्मा संतापल्या.
महिलेने अखेर फोन घेतल्यावर तो वाद चांगलाच चिघळला. आरोप आहे की संतापलेल्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलाने फोनवर अर्वाच्य शिवीगाळ केली आणि “चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी दिली. घरकामगार महिलेनुसार, तिच्या नवऱ्यालाही धमकी देत “जिथे असाल तिथून उचलून आणू” असे घरमालकीणीच्या मुलाने फोनवर म्हटले. घाबरलेल्या महिलेने हा सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला.
यानंतर पीडित महिलेचे नातेवाईक स्पष्टीकरण मागण्यासाठी घरमालकीणीच्या घराखाली आले. या वेळी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान घरमालकीणीच्या मुलाने बंदुकीसारखे दिसणारे एक वस्तू काढून पीडित महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना धाक दाखवला. अचानक समोर बंदूक दिसल्याने कुटुंबीय अधिकच घाबरले आणि त्यांनी तत्काळ कासारवडवली पोलिसांना कळवले.
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. चौकशीत धाक दाखवण्यासाठी वापरलेली बंदूक खरी नसल्याचे समोर आले. ती केवळ बंदुकीसारखी हुबेहूब दिसणारा गॅस लायटर असल्याचे निष्पन्न झाले. तरीही अशा प्रकारे धाक दाखवणे, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फोन कॉलवरील धमक्यांचे रेकॉर्डिंगही पीडित महिलेने पोलिसांना पुरावा म्हणून दिले.
या प्रकरणाची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात भेट देत पीडित महिलेच्या बाजूने आवाज उठवला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांकडून आता या घटनेचा सर्वांगीण तपास सुरू असून, धमकी, शिवीगाळ आणि मानसिक छळ यांसंदर्भात पुढील गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
घरकामगार महिला आणि घरमालकांमधील वाद नेहमीच ऐकायला मिळतात, पण ठाण्यातील ही घटना ‘वादातून धमकी’च्या टोकाच्या टप्प्यापर्यंत गेल्याने परिसरातही मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरही या घटनेबद्दल प्रतिक्रिया उमटत असून कामगार सुरक्षेबद्दलचे प्रश्न पुन्हा एकदा पुढे येत आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare