Palghar News: महालक्ष्मी उड्डाणपूल बनतोय अपघातांचा हॉटस्पॉट; 24 तासांत 5 वाहन दुर्घटनाग्रस्त
Palghar News: महालक्ष्मी उड्डाणपूल बनतोय अपघातांचा हॉटस्पॉट; 24 तासांत 5 वाहन दुर्घटनाग्रस्त
Palghar Accident News: डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. 24 तासांत 5 वाहन अपघातग्रस्त, 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी.
पुणे २७ डिसेंबर २०२५ : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी उड्डाणपूल सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे येथील या उड्डाणपुलावर गेल्या 24 तासांत सलग पाच वाहन अपघात घडले असून यामध्ये पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरील मोठमोठे खड्डे आणि रस्त्याची दयनीय अवस्था हे या अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवळवेढे महालक्ष्मी उड्डाणपुलावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक घ्यावा लागत असून त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांमध्ये धडक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या 24 तासांत पाच वेगवेगळे अपघात झाल्याने या मार्गावरील प्रवास जीवघेणा बनला आहे.
शुक्रवारी मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर खड्ड्यांमुळे एका ट्रक चालकाने अचानक ब्रेक घेतला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनांनी ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन ट्रकच्या मध्ये एक कार अक्षरशः चिरडली गेली. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कार चालक आणि एका महिला प्रवाशाला गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून या दृश्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच त्याच उड्डाणपुलावर पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक प्रवासी या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून जात असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विवळवेढे महालक्ष्मी उड्डाणपुलासह घोळ, आंबोली, दुर्वेस, वरई आणि खानिवडे येथील नदीवरील पुलांचीही अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या ठिकाणी केवळ तात्पुरत्या आणि तकलादू स्वरूपाच्या दुरुस्ती केल्या जात असल्यामुळे काही दिवसांतच रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे होत आहे.
वारंवार अपघात होऊनही NHAI कडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप केला जात आहे. रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे, योग्य साईन बोर्ड, वेगमर्यादा आणि प्रकाश व्यवस्था याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून नेमकी काय कारवाई केली जाणार, याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अपघात होण्याआधीच ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information