नववर्षाच्या पार्श्वभूमीवर FDA अॅक्शन मोडवर; राज्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्सची कडक तपासणी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर FDA अॅक्शन मोडवर; राज्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्सची कडक तपासणी
नववर्षाच्या स्वागतासाठी FDA कडून २४ डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान विशेष मोहीम. राज्यातील हॉटेल्स, क्लब हाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्ट्सची कडक अन्नसुरक्षा तपासणी होणार.
पुणे २९ डिसेंबर २०२५ : नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पार्ट्या, स्नेहभोजन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हॉटेल्स, क्लब हाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्ट्समध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि सर्वांना स्वच्छ, सुरक्षित व भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. राज्यात ‘नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ ही विशेष मोहीम २४ डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार असून, अन्न सुरक्षा विभाग पूर्णपणे अॅक्शन मोडवर आला आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान पाच मोठी आणि पाच मध्यम किंवा लहान हॉटेल्स, तसेच क्लब हाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्ट्सची तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नववर्षाच्या काळात अन्नाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याने अन्नाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्न साठवणूक, कच्चा माल, स्वयंपाकघरातील परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये आणि कचरा व्यवस्थापन या सर्व बाबींची बारकाईने पाहणी केली जाणार आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत सुरक्षित अन्नासह स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या आस्थापनांना प्रोत्साहन देण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते छाननी समितीने निवड केलेल्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षित अन्न व स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी सकारात्मक प्रोत्साहन मिळणार आहे.
तपासणी प्रक्रियेदरम्यान गंभीर अनियमितता आढळल्यासच अन्नाचे नमुने घेण्यात येणार आहेत. सहाय्यक आयुक्त (अन्न) हे तीन मोठ्या आणि तीन मध्यम किंवा लहान हॉटेल्सच्या तपासणीवेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहणार आहेत, तर सह आयुक्त (अन्न) एका मोठ्या आणि एका मध्यम किंवा लहान आस्थापनाच्या तपासणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहतील. तपासणीदरम्यान किरकोळ त्रुटी आढळल्यास संबंधित आस्थापनांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले जातील.
अन्न सुरक्षा अधिकारी तपासणीदरम्यान कालबाह्य कच्च्या मालाचा वापर, पनीरऐवजी चीज ऑनालॉगचा वापर आणि त्याचा मेनूमध्ये उल्लेख न करणे, आइस्क्रीमऐवजी गोठवलेल्या मिठाईची विक्री, अति प्रमाणात खाद्यरंगांचा वापर, भेसळयुक्त किंवा शिळे अन्न, तसेच हॉटेलची एकूण स्वच्छता यावर विशेष लक्ष देणार आहेत. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी परिस्थिती आढळल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेतील सर्व तपासण्या पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने नोंदवल्या जाणार असून, संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सचिवांमार्फत मंत्र्यांच्या कार्यालयास सादर केला जाणार आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी सुरक्षित अन्नाची तयारी व पुरवठा सुनिश्चित करावा, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नववर्षाच्या उत्सवात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हाच या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information