पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ३ व ४ मधून भाजपकडून सुरेंद्र पठारे व ऐश्वर्या पठारे रिंगणात
पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ३ व ४ मधून भाजपकडून सुरेंद्र पठारे व ऐश्वर्या पठारे रिंगणात
पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्व पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून उच्चशिक्षित दाम्पत्य सुरेंद्र पठारे व ऐश्वर्या पठारे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल; विकास, नेतृत्व आणि सामाजिक कार्याचा मुद्दा केंद्रस्थानी.
पुणे ३० डिसेंबर २०२५ :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, वडगाव शेरी परिसरातून एक उच्चशिक्षित दाम्पत्य निवडणूक रिंगणात उतरल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर–लोहगाव) तर सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक ४ (खराडी–वाघोली) मधून निवडणूक लढवत आहेत. शिक्षण, व्यावसायिक अनुभव आणि सामाजिक कार्याच्या जोरावर हे दाम्पत्य मतदारांसमोर नवा पर्याय म्हणून उभे ठाकले आहे.
सुरेंद्र पठारे हे उच्चशिक्षित अभियंता असून त्यांनी पुण्यातील नामांकित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) येथून शिक्षण घेतले आहे आणि ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे पूर्व पुण्यात भाजप संघटनेला बळकटी मिळाल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम देवेंद्र’ला अभ्यासू, तांत्रिक दृष्टिकोन असलेले आणि तरुण नेतृत्व मिळाल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. शहराच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि स्मार्ट सिटीशी संबंधित प्रश्नांवर तांत्रिक दृष्टीकोनातून काम करण्याची त्यांची भूमिका मतदारांमध्ये आकर्षण ठरत आहे.
दुसरीकडे, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवत राजकीय क्षेत्रात सक्रिय पाऊल टाकले आहे. त्या उच्चशिक्षित उद्योजिका असून सामाजिक कार्यात त्यांचा भरीव सहभाग आहे. महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास, स्वावलंबन आणि सामाजिक जागृती या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार (२०१४) तसेच फायनान्शियल टाइम्स बिझनेस अवॉर्ड (२०२२) यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. ‘सखी प्रेरणा मंच’च्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना एकत्र आणत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
वडगाव शेरी परिसरात त्यांनी जेजुरी हरिद्रा मार्तंड पूजा हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला होता. या उपक्रमात हजारो महिलांचा सहभाग लाभला असून धार्मिकतेसोबत सामाजिक एकतेचे दर्शन घडले. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे ऐश्वर्या पठारे यांची ओळख प्रभावी सामाजिक नेतृत्व म्हणून अधिक ठळक झाली आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न, महिला सुरक्षेचा मुद्दा, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा याबाबत त्या ठोस भूमिका मांडत आहेत.
एकाच कुटुंबातील दोन उमेदवार वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरत आहे. शिक्षण, अनुभव आणि सामाजिक कार्य या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे भाजपला पूर्व पुण्यात नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या दाम्पत्याची कामगिरी आणि मतदारांचा प्रतिसाद पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालावर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकतो.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information