बोगस कागदपत्रांमुळे आगळंबे गावच्या पोलिस पाटलांची नियुक्ती रद्द; उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश
बोगस कागदपत्रांमुळे आगळंबे गावच्या पोलिस पाटलांची नियुक्ती रद्द; उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश
आर्थिक दुर्बल घटकाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आगळंबे गावच्या पोलिस पाटील श्रुती पायगुडे यांची नियुक्ती रद्द. हवेली विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय.
पुणे 0६ डिसेंबर २०२६ : बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस.) प्रमाणपत्रामुळे हवेली तालुक्यातील आगळंबे गावच्या पोलिस पाटील पदावर नियुक्त करण्यात आलेल्या श्रुती नवनाथ पायगुडे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी हवेली विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी आदेश दिला असून, त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महसूल व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
श्रुती पायगुडे यांची २०२३ साली आगळंबे गावच्या पोलिस पाटील पदावर नियुक्ती करण्यात आली होती. हे पद आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी आरक्षित होते. नियुक्तीच्या वेळी श्रुती पायगुडे यांनी आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, हे प्रमाणपत्र बोगस व नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात मोनाली स्वप्नील पायगुडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान श्रुती पायगुडे यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली तसेच त्यांना सुनावणीची संधी देण्यात आली. मात्र, सुनावणीदरम्यान आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र योग्य व वैध असल्याचे ठोस आणि सबळ पुरावे त्या सादर करू शकल्या नाहीत. परिणामी, शासन निर्णय दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ मधील तरतुदीनुसार हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्याचा थेट परिणाम पोलिस पाटील पदावरील नियुक्तीवर झाला. उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, बोगस कागदपत्रांच्या आधारे आरक्षित पदाचा लाभ घेणे हे नियमबाह्य असून अशा प्रकरणात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रुती पायगुडे यांची आगळंबे गावच्या पोलिस पाटील पदावरील नियुक्ती रद्द करण्यात येत आहे.
या आदेशाची अंमलबजावणी हवेली तालुका तहसीलदार अर्चना निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तहसीलदार निकम यांनी सांगितले की, उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश श्रुती पायगुडे यांना ई-मेलद्वारे कळवण्यात आला असून, मंडल अधिकारी त्यांना समक्ष भेटूनही आदेशाची प्रत देणार आहेत. प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेत कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे आरक्षणाच्या लाभासाठी बोगस कागदपत्रांचा वापर करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या सवलती खरोखर पात्र असलेल्या व्यक्तींनाच मिळाव्यात, यासाठी अशा चौकशा आणि कारवाया आवश्यक असल्याचे मत प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. आगळंबे गावच्या पोलिस पाटील नियुक्ती रद्द प्रकरणामुळे भविष्यात अशा नियुक्त्यांवेळी कागदपत्रांच्या पडताळणीवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information