Thackeray Brothers Interview: “मालकाच्या हातावर बसलेले ससाणे”; राज ठाकरेंचा भाजप व देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला
Thackeray Brothers Interview: “मालकाच्या हातावर बसलेले ससाणे”; राज ठाकरेंचा भाजप व देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीत राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीसांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ‘ससाण्यांची’ उपमा देत घणाघात.
पुणे ८ जानेवारी २०२६ : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक संयुक्त मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर आणि शिवसेना फोडीवर स्पष्ट, आक्रमक आणि बोचऱ्या शब्दांत भाष्य केले. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका करताना त्यांना “मालकाच्या हातावर बसणारे ससाणे” अशी उपमा दिली, तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी भाजपच्या राजकीय कार्यपद्धतीवर प्रहार करत सांगितले की, आज राजकारणात स्वकीयांनाच संपवण्याचा खेळ सुरू आहे. ससाणा जसा मालकाच्या हातावर बसून त्याच्या इशाऱ्यावर शिकार करतो, तशीच परिस्थिती भाजपच्या स्थानिक नेत्यांची असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीत बसलेल्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून स्वतःच्या पक्षातील माणसांना फोडणे, हा राजकीय डावपेच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेमागील भूमिका अधोरेखित करत भाजपवर निशाणा साधला. मराठी माणसाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, राजकारणात पक्षांतर नवीन नाही, पण एखादा पक्षच मुळापासून संपवण्याचा प्रयत्न करणे हे अघोरी राजकारण आहे. आमची माणसे फोडून शिवसेना संपवण्याचा प्रयोग का केला गेला, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी पुढे जात महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप केला. मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी जाती-जातींमध्ये भांडणे लावली जात असल्याचे सांगत, हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठीचे राजकारण नसून राज्याच्या एकतेवर घाला घालणारे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.
या मुलाखतीतील सर्वात आक्रमक टप्पा म्हणजे राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला भ्रष्टाचाराचा हल्ला. अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे घेऊन जाणार असल्याचे फडणवीस म्हणत होते, मग ते पुरावे आता कुठे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढे गंभीर आरोप असतील तर ते कोर्टात का सादर करण्यात आले नाहीत, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.
इतक्यावरच न थांबता, राज ठाकरे यांनी “४० आमदारांसाठी ५० खोके म्हणजे २ हजार कोटी रुपये होतात. हे पैसे कुठून आले?” असा सवाल करत संपूर्ण सत्ताबदल प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. हे पैसे कोणत्या बँकेतून कर्ज म्हणून घेतले होते का, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. “आपले झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याचे वाकून बघायचे” या पातळीवर फडणवीस आले असल्याचा घणाघात त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी भाजपमधील अनेक नेत्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसल्याचेही म्हटले. या नेत्यांचा संपूर्ण राजकीय डोलारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर उभा असल्याचा आरोप करत, ही ‘बसवलेली’ माणसे असून ती फक्त आपल्या धन्याचा शब्द ऐकतात, असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे बंधूंची ही संयुक्त मुलाखत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलणारी ठरेल का, आणि भाजपकडून यावर काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information